शुद्ध ९ मंगळवारी राजश्री जानोजी निंबाळकर श्रीमंत राजश्री पंतप्रधान यांच्या घरास लग्नास आले. त्यास सामोरे खासा, नाना व भाऊ पुढें गेले होते.
शुद्ध १० बुधवार. सटवोजी जाधव याचें दुसरें लग्न जालें. चिखलीस जालें. देवजी ताकपीर यांची लेक केली असे. १
ह्माकोजी पाटील झांबरे याची लेक लखमोजी सोनवणियाचे लेकास दिल्ही.
शुद्ध ११ गुरुवारीं रोजगुदस्ता देव्हाराघरचा देव मोरया थोरला होता त्याची खेळ पडली असे. आंत लहान नरमद्या होता.
शुद्ध १३ मंदवार. राजश्री पंतप्रधान यांचे दुसरे पुत्र माधवराऊ यांचे लग्नाची देवकप्रतिष्ठा दोप्रहरा खाशा नानानीं केली.
शुद्ध १४ रविवारीं राजश्री माधवराऊ श्रीमंताचे पुत्र याचें लग्न दिवा साडेपंधरा दिवस आल्यावरी लागलें. राजश्री शिवाजीपंत हुजूरपागेचा कारकून याची कन्या केली. विष्णुपंताच्या वाडियांत लग्न लागलें असीउंबरीचे पागेवर शिवजीपंत असतात. गराडियांत राहत असतात. यासीं सोयरीक केली. पहिले, नरजोशियाची नात लालपाणीहून आणिली होती. ती मुळाची ह्मणून बाष्कीळ निघाली. यामुळें फिरावली. तिच्या मायबापाचें समाधान देऊन घेऊन करून वाटे लाविलें.
शुद्ध १४ रविवारीं श्रीमंताचेथें लग्नास श्रीधरणीधर देव आले. नदीपलीकडे राहिले.
शुद्ध १५ सोमवार सटवोजी जाधव पेशवियाचेथें लग्नास आले.
मार्गेश्वर वद्य १ मंगळवारीं महादाजी शंकर याचे वडील पुत्र दादोबा, चिमणाजी नारायण सचीव याचे बंधू, वारले असेत.