वद्य ४ बुधवार, पेशवे वानवडीचे मुक्कामीहून थेवरास श्रीच्या दर्शनास जाऊन आले. भाऊ वाघोलीस जाऊन दुखवटा जाधवास देऊन आले. दिनकरपंत व बाबा सरनाईक व गोविंदपंत तुटकणें व बापूजी आनंदराऊ हे येऊन गांवांतील वाडे, नाईकवाडे वगैरे मोजून याद लेहून घेऊन गेले. ब्राह्मणास द्यावयास.
वद्य ५ गुरुवासर. रामाजीपंत अकळुजेहून पसरीस गेले होते ते घरास आले. त्याणी सांगितलें की शिवभट दिवटे पसरीस आपले घरीं दुखणिया पडोन वद्य ४ बुधवारीं वारले.
वद्य ११ बुधवार, आळंदीची यात्रा. पेशवे वानवाडीचे मुक्कामीहून यात्रेस जाऊन देवदर्शन घेऊन माघारे आले असेत.
वद्य १२ गुरुवारीं देवहि आळंदीचे यात्रेस आले.
कार्तिक वद्य १४ मंदवार, अमवाश्याहि रोजमजकुरींच आली.
मार्गेश्वर मास.
मार्गेश्वर शुद्ध १ रविवारी रात्रीं पेशवे वानवडीचे मुक्कामीहून रात्रीं पुणियास घरास आले, लग्नाकरितां.
शुद्ध ४ बुधवारी प्रहररात्री उमाबाई दाभाडियास, पुणियांत नुढगेमोडीपाशीं डेरे देऊन राहिली होती, तेथें वारली. सेनापति जवळ होते. १
पुणियांतच दहन केलें असे. दुसरे रोजी दाभाडे अवघीं तळेगांवास गेलीं.
शुद्ध ६ सह ७ मंदवासर, चंपाषष्ठी.