शुद्ध ७ शुक्रवारी पर्वतीच्या तळियापासून श्रीमंतांनी कुच करून वानवडीवर जाऊन राहिले. रोजमजकुरीं सटवाजी जाधवराऊ याची बायको लाडूबाई, आंगरियाची लेक, वाघोलीस दुखण्या पडोन वारली. लाडूबाई देशमुख दोन तीन रोज आगोधर परामृषास गेली होती, ती तेथें असतांच, ती वारली असे. संध्याकाळचा चार घटका दिवस राहिला ते समयीं वारली.
गोविंदरायाचा वाडा मचाळियाबरोबर, त्यापैकीं, बाबास दिल्हा तो त्याणीं मोरभट शाळिग्राम यास दिल्हा.
कार्तिक शुद्ध ८ मंदवार. राजश्री तान्हाजीपंत हवालदार बायको घेऊन रोजमजकुरी रात्रीस महायात्रेस गेले. सकाळ उठोन मंदवार.
कार्तिक शुद्ध ९ रविवारी राजश्री पंतप्रधान वानवडीचे मुक्कामीहून वाघोलीस राजश्री सटवोजी जाधवराऊ याची स्त्री वारली ह्मणोन जाऊन माघारें आले.
कार्तिक शुद्ध ११ मंगळवारी अकळुजेहून राजश्री अमृतराऊ निंबाळकर याचें पत्र मातुश्री लाडूबाईस आलें कीं, मिठोजीबाबा घाटगे यास छ ४ मोहरमी बुधवारी देवआज्ञा कडेगांवीं जाली. त्याची स्त्री सती निघावयाचा विचार आहे. तर सौ। शाहाबाईस त्याचे भेटीकरितां पाठवून देणे. ह्मणून कागद आला. गराडियाच्या गोसावियांनी सांगितलें कीं, पाठवूं नका. त्याजवरून राहिली. रामाजी शिवदेव पाठविले असेत.
कार्तिक शुद्ध १३ गुरुवासर. गांवांतील गल्ल्या थोर केल्या. पुढें वाढविली होती तीं पाडलीं असेत. १
शुद्ध १४ शुक्रवासर. पेशवियाच्या वाडियापुढें पूर्वेकडे ब्राह्मणांचीं घरें होतीं तीं काहडणार. ताकीद केली असे. १
शुद्ध १५ मंदवार, वितिपात. पर्वतीस पेशवियानीं काल्हवडी व गोर्हे सोडिले. गोदानें केली.
कार्तिक वद्य १ रविवारी अवशीचे सा घटका रात्रीस शेकोजी जगथाप याणें आपले हातें येजिदखत राणोजी बिन्न महिमाजी जगथाप याचे पदरीं घातलें.