वद्य ७ शुक्रवारीं श्रीमंत भाऊ मुहूर्तेकरून डेरियास नेहमीं १ गेले. पहांटे गेले. दिवस उगवून शुक्रवार.
वद्य ९ रविवार सह १० पेशवे, दुर्जनसिंगाचे हवेलीस, समशेरबहादूर याच्या सासर्याचेथें, वस्त्रें घ्यावयास आले. महादोबाहि जातां जातां गोविंदरायाच्या घरास आले. लक्षमीबाईस पैठणी, लुगडें चोळी दिल्हीं. आबा देशपांडियाचे पछमेस वाडा नवा गोविंदरायाचा आहे. त्यापैकी पंचाळे राहतात ते जागा टाकून, वरकड जागा महादोबां दिल्हा. आधले रोजीं रावजी माणकेश्वर महादोबांनीं गोविंदरायाचेथें पाठविले होते. एकबोटियानी सल्ला देऊन कागदपत्र दिल्हा ह्मणून ऐकिलें. सदरहूप्रा। जालें असे. १
वद्य १ ४ सह ३० अमावाशा शुक्रवार ग्रहण सूर्य. संध्याकाळीं ग्रहस्त जाला. अंधार पडला. शेवट उजेडलें. महापर्व पडले. पेशवियांनी पुण्याचे संगमीं डेरे देऊन दानधर्म फार केला. हस्ती दान दिल्हे. दोन घोडे व गोदानें दिल्हीं. यमधर्म वगैरे दानें केली. त्यांच्या आरशेमहालास मोहोळ लागले होतें. आसपास घुबड बसत होतें. त्याचेंहि विधान केलें.
कार्तिकमास.
कार्तिक शुद्ध १ मंदवार. दिपवाळी ग्रहणाची कर.
शुद्ध २ रविवार. यंत्रद्वितिया. पाऊस रात्रीं फार पडला.
शुद्ध ३ सोमवार. उत्तम मुहूर्त.
शुद्ध ६ गुरुवार पेशवियाचेथें वाडियांत कांहीं शांत केली. पेशवे पासणियासहि गेले होते. पंकेश्वराचें दर्शन प्रथमच त्यांनी घेतलें असे. पांच रुपये वाहिले असेत. १