शुद्ध ५ रविवारी रामाजी शिवदेव मोरेश्वरास देशमुखानी कामाकाजास पाठविले ह्मणून गेले असेत.
दादोबा प्रतिनिधीची एक स्त्री सती निघाली असे.
शुद्ध ७ मंगळवार. शंभुसिंग जाधवराव श्रीमंताचे भेटीस आले.
शुद्ध १४ मंगळवार. उमाबाई व सेनापति तळेगांवाहून पुणियास पेशवियाकडे आलीं असेत. १
शुद्ध १५ बुधवार. अहळाची पांढर पीर शेख सल्लाच्या दरगियांत घातली.
आश्विनमास.
शुद्ध ३ रविवारी जगोबास त्रिंबकभट र्धा। घेऊन गोविंदरायाकडे गेले. ते व त्यांचे बंधू ऐसे कितेक भाषण सवरसाचें केलें.
शुद्ध ४ सोमवारी गोविंदरायानीं एकबोटियास बोलावून कर्हेपठारची सनद दिल्ही. वंशपरंपरेची ह्मणून ऐकतों. तिघांच्या नांवे हेंहि ऐकतों. वकिली सांगणार हेहि ऐकिलें. अगोधरीच राजकारण होतें.
शुद्ध ७ गुरुवार सह ८.
शुद्ध ८ सह ९ शुक्रवार, पारणें.
शुद्ध ९ सह १० मंदवार, दसरा. रात्रौ पेशवे मुहूर्तेकरून पर्वतीजवळ जाऊन डेरे देऊन राहिले.
शुद्ध १२ मंगळवार सुभानजी फुगा भोंसरीकर ढाळ घेतलाला होता आणि वारला. त्या अगोधर शितोजी लांडगा चौ, चार पांच रोज अधिक उणें जालें, मेला असे.
वद्य ६ गुरुवारीं शमशेरबहादुर याचें लग्न जालें. निंबगिरीच्या किल्लेदाराची लेक केली. किल्लेदारास दुर्जनसिंगाचे हवेलींत जानोसा दिल्ही होता. १