शुद्ध ७ रविवारी धोंडोबा पुरंधरे याणीं बोलावून नेऊन आपलें घरगतें वर्तमान सांगितलें. भाऊ पर्वतीस जाऊन रमणियाचा वोढा बांधला. ब्राह्मणास दक्षणा द्यावयाकारणें.
शुद्ध ८ सोमवारी पुणियांत ब्राह्मणास दक्षणा द्यावयाचा आरंभ केला. पांचा ठायीं दक्षणा द्यावयास द्वारें केली. जागाजागा चौक्या ठेविल्या. आणि दक्षणा फार फार दिल्या. बारा तेरा लाख रुपये वांटिले. खबूतरखानियांत भिकारभणंग यांस देकार महादाजी गोविंद याजकडून देविला. अठरापगड जातींतून जो घ्यावयास गेला त्याजला देकार दिल्हा. रमणियांत रात्री दिवट्या लाविल्या. ब्राह्मणावर उजेड पाडिला. दुसरे दिवशीं मंगळवारी रात्रीं अडीच प्रहर रात्र जाली तेसमयीं ब्राह्मण सरले. मग सुटले. गांवपावेतों. वाटेनें दुरस्ता हिलाल लाविले. त्या उजेडें ब्राह्मण गांवांत आले. चौदा प्रहर दक्षणा वांटिली. मोठा धर्म जाला. पन्नास साठी हजार ब्राह्मण हलला. सत्तर हजारपर्यंत गणती आली. नाना धर्मात्मा थोर ! ऐसा कोणी जाला नाहींसा दिसतें. १
शुद्ध ९ मंगळवारीं ब्राह्मणास दक्षणा अडीच प्रहर रात्र होईतोंपर्यंत देतच होते. मग ब्राह्मण सरले. मग उठले. १
शुद्ध १३ मंदवार शनिप्रदोष. क्षत्रोजी व शेकोजी ना। अंबेलकर यांची मनसुबी नारो आप्पाजीकडे पाडली होती. त्यास सेखोजीनें बाबाकडे सांगून हुजूर श्रीमंताचे मनसुबी करावीसी जाली.
शुद्ध १४ रविवार कुलधर्म. श्रीमंतानीं, सुवर्णधेनू करून तिचें गोदान करणार, त्याचें अधिवसन पर्वतीस देवदेवेश्वराजवळ केले. दुसरे रोजीं गोदान तेथेंच जाऊन केलें असे. या दानास [ पुढें जागा कोरी.]
शुद्ध १५ सोमवार श्रीमंतानी पर्वतीस देवदेवेश्वरापाशीं सुवर्णगोदान दिल्हें असे. १