शुद्ध ४ गुरुवार. ईद रमजान. कुतबा काजीच पढले, वारले, पीर जाले. सैद नाईबीशीं व खातिबीशी भांडतात. मागें त्याणीं अमानतपत्र आणिलें होतें, दिकतीचें. परंतु श्रीमंतानीं काजीसच कुतबा पढावयास सांगितला असे. पुढें मनसुबी करणार. सैदांनीं निमाज वरल्या दरगायांतच केली. समशेरबहादूर नेला होता.
शुद्ध ५ शुक्रवारीं श्रावणी केली. पुढें पूर्णमेस श्रवण नक्षत्रीं करावी, परंतु सिंहसंक्रांत ते दिवशीं निघते, याजकरितां हस्त नक्षत्र आजी पंचमीस, ह्मणून आजीच श्रावणी केली. नदीस जागा पाणी आलें ह्मणून नाहीं. याजकरितां बाबूजी आनंदराऊ कमाविसदार याचेथेंच श्रावणी केली असे. शिवरामभट शाळेग्राम याणीं यंदा नव्या मुंजी ज्या मुलाच्या जाल्या आहेत त्यांची श्रावणी करितां येत नाहीं, ह्मणून राहिली असे. वेजूरयेदियांची श्रावणी यंदा राहिलीसें दिसतें.
शुद्ध ६ मंदवारीं श्रीमंतानी दक्षणा ब्राह्मणास द्यावी. त्यास पाऊस उघडला नाही. दुसरे शिरवळापाशीं व भीमेवर ब्राह्मण आले आहेत. पाऊसामुळें आवरें नदियानीं केली. एक एक नाव. ब्राह्मण झाडून उतरूं पावले नाहीत. याजकारितां दक्षणा दिधली नाहीं. ब्राह्मण आलियावर देणार.
रोज मजकुरीं शिराळशेटीचा दिवस. उभयतां देशमुखास दौलतरावबावाच्या मुलाचें सुतक होतें. परंतु शिराळशेटी घालून नदीस पोंचविले. विशेष समारंभ केला नाहीं. वाजंत्री लावून नदीस नेऊन
टाकिले असेत. १
रोजमजकुरीं मौजे वानवडी ता। हवेली पाटील, चौगुले यांच्या शिराळशेटीची कटकट जाली. कुसाजी जांबूळकर याचा वडील पुतण्या चौगुलकी करितो. शिराळशेटी घालीत आले आहेत. त्याजला संभाजी माळी जांबुळकर व सुभानजी हे कटकटीस आरंभले आहेत. द्वाही देणार ह्मणून अबाजीपंत कुलकर्णी याणीं सुभानजीस सांगितल्या च्यार गोष्टी विचाराच्या. तेव्हां त्यानीं कबूल केलें कीं, तूर्त आह्मीं कजिया करीत नाही, परंतु पुढें आमचें त्याचें मनास आणा. ऐसें कबूल केले. मागती मंदवारीं बदलला कीं, आह्मीं आडवें येऊं. त्याजवरून कुसाजीचा भाऊ येथें आला. त्याजपाशीं जमीदारीचे कागद पांढरीस मोकदमाच्या नांवें दिल्हे कीं, याचा शिराळशेटी चालत आला आहे, तैसा चालों देणे. ज्यास भांडणें असेल त्याणें येथें यावें, मनास आणिलें जाईल. ते कागद दाखविले. आपण अवघे घरास गेले. शिराळशेटी नवा ह्मणून सांगितलें. संभानें पोर आपला पाठविला. तो जाऊन वेशीपाशीं शिराळशेटी काठीने पाडिला. रामोजी जगथाप याणें शिदोजीचा शिराळशेटी उजवीकडे असतो तो आपल्या हाते आपल्या डावीकडे केला. चौगुलियाचा पडिला. पाटिलाचेंहि उजवे डावें जालें. याजमुळें तेथेंच शिराळशेटी ठेविले. येथें माळी बोभाट घेऊन उभयतां आले. संभाजी ह्मणों लागला की, आह्मीं कजिया करणार होतों. तुमचा कागद आला. मग आह्मीं घरास गेलों. पोरास कागदाचा विचार ठावका नव्हता. त्याणें शिराळशेटी पाडिला. पोरासोरी जाली. म्या आपल्या पोरास काठी मारिली कीं, तू कां आडवा जालास ? कुसाजीस सांगितले कीं, तुह्मी आपला शिराळशेटी न्या. परंतु हे नेईनात. वेशींतच ठेविला. ऐसें त्याणें सांगितले. कुसाजीच्यांनी सांगितलें कीं, याणीं पाडिला, मग आह्मीं उगेंच काशियास न्यावा ऐसें सांगितलें. ऐशियास, संभाजी माळी जिवाजीपंताचा सरिक, त्याजपावेतों हा लांबवील, याजकरितां बाळकृष्णपंतास माळियाचें वर्तमान सांगितले. त्याणीं प्यादा बा। दिल्हा कीं, शिराळशेटी नदींत टाका आणि हुजूर या. ऐसें दुसरे रोजी जालें असे. १