वद्य १४ रविवारी माणकोजी गौळी चिंचोलकर याणें सयाजी गुणनवरियास चौगुलकीचा लटका कागद करून दिल्हा होता, ह्मणून त्याचा उजवा हात, व सयाजीनें लटका कागद त्याजपासून घेऊन लटकें भांडण भांडला ह्मणून त्याचा उजवा हात, ऐसे तोडले. दोघांचे. गुण नवरियास गुन्हेगारी ऐन आठशें पन्नास खंडली होती ते काशियास पाहिजे ? होतच तोडावे ऐसें ह्मणून हात तोडिले असेत.
वद्य ३० सोमवार देशमुखाचा शिक्का, गुणनवरियाने खेरियास येजितखत लेहून दिल्हें, त्याजवरून करून दिल्हा. शाहीहि कल्याणबावाच्या हातची लि। असे. नकल असे. १
गुणनवरियास साडेआठशें रु॥ गुन्हेगारी खंडली होती ते सोडिली. कतबा फाडिला. हातच तोडिला. पाहिले पन्नास रु॥ घेतले तेवढेच पाडले. खोरियास अडीचशें हरकी खंडली होती ते भाऊस थोडी वाटली, ह्मणून आणीख दीडशें, येणेंप्रमाणें चारशें करार करून कतबा घेतला. अडीचाश्याचा माघारा दिल्हा असे. १
श्रावणमास.
श्रावण शुद्ध १ मंगळवारीं सुलतानजी शिरोळा भांबवडियांत पाहटे वारला. त्याचा घात जाला. त्याचा धाकटा भाऊ गोविंदराऊ शिरोळा यास वेडसरावर घातलें. तोहि कोठें उपाय करावयास दोन अडीच महिने गेला आहे. बंधू मेला. दोन तीन महिने निजेला होता. हगवणहि शेवटीं लागली. वारला. सारांश भांबवडियाची पाटीलकी त्याजला धारजिणी जाली नाहीं. ऐसें घडोन आलें असे. १
शुद्ध २ बुधवारी दौलतराऊ शितोळे देशमूव याचा पुत्र, पहिले बायकोचा, तिसरा, तुकोजीबावा, यास मध्यरात्र उलटलियावरी पुणियांत देवआज्ञा जाली. दिवस उगवून बुधवारी दहनास संगमास नेला. पाऊस पडतच होता. आमदाबाजेकडे लश्करास राजश्री रघुनाथपंतदादाबरोबर बापासमागमें चाकरीस गेले होते. लश्करांतच दुखणे जालें. खंग लागली होती. तिणेंच उठोन वारला असे. त्याजला एक पुत्र चौ पांचा वरसांचा आहे.