वद्य ६ शुक्रवारी चिंचोली ता। पाटस येथील पांढर पीर शेख सल्ला याच्या दरगियास नेऊन साक्ष पुसिली कीं, बहिरजी खोरा चौगुली यासी गुणनवरे मौजे मा।र हे चौगुलकीचे भांडण भांडतात, याची साक्ष सत्य असेल ती सांगणे. सर्वानीं पृथकाकारें सांगितले की, गुणनवरे थळकरी, खोरे चौगुले, खरे. ऐसी साक्ष बदली असे. गुणनवरे याणीं कागद एक काढिला. तो बहुता दिवसांचा, गैरसाल. कुलकर्णी याचे दस्तूर खरे न जालें. तेव्हां हा कागद कोणापाशीं होता ह्मणून पुसतां त्याणी सांगितले की, माणकोजी गौळियाचे दोनशें रुपये आह्मापाहून घेऊन दिल्हा तेव्हां माणकोजीस पंचवीस रुपये मसाला करून आणावयास बहिरजी सोरटे पाठविले. त्याणी मसाला घेऊन आणिला. त्याजला पुरशीस करतां त्याणे सांगितले की, आपण तगलुपी कागद करून दिल्हा, कागद शेण लावून भिजवून दाखविला कीं, याप्रा। केला. लेहविला कोणापासून ? तेव्हां त्याणें सांगितले की, रामदासीबावा याचेथें प्रल्हादपंत ह्मणून ब्राह्मण होता त्याजपासून लेहविला. तो पंधराक रोज जाले वारला. ऐसें सांगितलियावरी माणकोजीस बेडी घालून ठेविला. कागदामुळे व पांढरीच्या साक्षीमुळे, गुणनवरे खोटे जाले, खोरे खरे जाले असेत. १
आषाढ वद्य ६ शुक्रवार. रोजमजकुरीं गोविंदराऊ बिन्न अडवोजी ना। वरळेकडील याजला तीन घटका रात्र उरली तेसमयीं पुत्र जाला. दिवस उगवून मंदवार.
वद्य ९ सोमवारीं बकाजी माळी लडकज यापासून हाती लेक धरवून नागेश्याची क्रिया घेतली कीं, फसलियामुळे मागें सुभानजी ढोलियापासून घेतेसमयीं खर्च लागला, तो दगड माळियापासून कांहीं घेतला नाहीं. घेतला असिला तरी आपल्यास श्री खता दाखवील. जरी ख़ता जाली तरी दगड माळियास निम्मे फसला द्यावा. न जाली तरी फसलियासी समंध नाहीं ऐशी. क्रिया घेतली असे. १
वद्य ९ मंगळवार. रतनगज हत्ती पेशवियाचा. फत्तेसिंगबावाबरोबर बीजगज हत्ती सवाई होता. जायाप्पाने आणून दिल्हा होता. त्याची याची लढाई पेशवियानीं तीनेकवार जाले, लाविली. रतनगजानें शिकस्त खादली होती तो आजि वारला असे. रुजूं. दुसरा हत्ती एर्हवीच होता तो वारला. रतनगज आहे. १
वद्य १० बुधवार चिंचोली ता। पाटस येथील गुणनवरे खोटे जाले. खोरे खरे जाले. चौ। गुणनवरियानीं येजितखेत दिल्हे असे.
वद्य १३ मंदवारीं, रामचंद्रबाबा पंढरपूर करून पुणियास आले.