भाद्रपद वद्य १३ गुरुवारी सव्वा दोप्रहरा दिवसा सौ। गोदूबाई प्रसूत जाली. पुत्र जाला. सुदीन होता.
आश्विन शुद्ध रुजू. भाद्रपद वद्य ५ गुरुवारीं गाजदीखान लश्करांतून शहर अवरंगाबादेंत रोजमजकूरी जाऊन दाखल जाले.
आश्विन शुद्ध ९ चंद्रवारीं नवाब गाजदीखान यास शहर अवरंगाबाद येथें विषबाधा होऊन देवआज्ञा जाली.
आश्विन शुद्ध ८ रविवारीं श्रीमंत राजश्री पंतप्रधान यांच्या व राजश्री मल्हारजी होळकर व जायाजी शिंदे यांच्या भेटी राक्षसभुवनाजवळ जाल्या.
आश्विन वद्य १० बुधवारी राजश्री विश्वासराव व राजश्री माधव, प्रधानपंताचे पुत्र, व राजश्री त्रिंबकराऊ विश्वनाथ ऐसे रोज मजकूरी लश्करांतून फिरोन येथें आले.
छ १२ मोहरमीं मोगलाजवळ श्रीमंत गेले. मोंगलानें सल्ल्यावर घालविलें. भेटी होणार.
छ मोहरमीं श्रीमंताची व मोंगलाची भेट जाली. सल्ला जाला. मोंगलानें ज्याप्रा। गाजदीखानानें मुलूक दिल्हा होता, त्याप्रमाणें करार करून, श्रीमंतास दिल्हा. अशी खबर छ आली. श्रीमंताचा प्रताप विशेष जाला.
कार्तिक वद्य ९ सह १० बुधवारी राजश्री नारो आप्पाजी लश्करास गेले होते ते रोजमजकुरीं आले, पुणियास. १
राजश्री महादोबा बाबा व धोंडोबा आप्पा व नाना व राजश्री मल्हारजी होळकर व जायाजी शिंदे ऐसे हुमणाबादेहून श्रीमंताचा निरोप घेऊन निघाले ते आपलाल्या गांवास आले. मार्गेश्वर शुद्ध (कोरी जागा) खंडेराऊ होळकर यानीं वाटेना जातां गांव लुटले व पैका गांवगन्ना घेतला.
छ रबिलावल पुस शुद्ध ३ रविवारी खबर आली की, नाशकी विनायक दीक्षित यास देवआज्ञा जाली. मार्गेश्वर वद्य १४ त्रियोदशीस नाशकास गेले. चतोर्दशीस वारले.
छ २ रबिलावल पुस शुद्ध ४ सोमवारीं यादोभट ढेकणे यास देवआज्ञा जाली.
छ ३ रबिलावल पुस शुद्ध ६ बुधवारी संक्रांतीस राजश्री जायाजी शिंदे पुणियास आले. त्यांजला सामोरे राजश्री विश्वासराव व माधवराऊ, श्रीमंताचे पुत्र, गेले होते.
छ रबिलावल पुस शुद्ध ९ मंदवारीं राजश्री मल्हारजी होळकर राजश्री विश्वासराऊ यांचे भेटीस आले. विश्वासराऊहि पुढें सामोरे गेले होते.
छ रबिलावल पुश ३ सोमवारी जायाजी शिंदे पुणियाहून सकाळचे निरोप घेऊन गेले.
छ रबिलावल पुश वद्य ४ मंगळवारी राजश्री मल्हारजी होळकर पुणियाहून निरोप घेऊन गेले.
छ रबिलावल पुश वद्य ७ गुरुवारी राजश्री जगन्नाथपंतास तिसरा पुत्र प्रातःकाळीं जाला.