छ १४ सवाल, श्रावण शुद्ध १६ गुरुवारी राजश्री पंतप्रधान रोजमजकुरीं वानवडीहून कुच करून जाऊन कवडीच्या वाकाणी जाऊन राहिले. लोणीच्या गांवकरीस ओढियाच्या पाणियावर राहिले. शेणवारी जेजुरीस जाऊन, रविवारी मोरगांवास जाऊन, मुक्कामास लोणस तसेच आले. रविवारींच राजश्री महादोबाबाबा, लोणीहून कुच करून दिवसाच सासवडास गेले. सोमवारी लोणीचे मुक्कामी श्रीमंतानीं थेऊरचे कुलकर्णी विठोबा व खंडो गोविंद याजला कागद करून दिल्हा की, सरकारांत तुमचें निम्में कुळकर्ण महादाजी नारायण यांजपासून खरीदखत करून घेतलें होते, तेंहि माघारें दिल्हें. खरीदखताप्रा। पैका राजश्री नारोपंत नाना याजकडे द्यावयास सांगितला आणि विठोबास व खंडो गोविंद यास दोघास दोन तिवटें दिल्हीं. १
श्रावण वद्य ५ मंगळवारी लोणीहून श्रीमंत कुच करून, नांदूर खामगांव येथें जाऊन, मुक्काम केला. तेच दिवशीं सैदलष्करखान व जानोजी निंबाळकर ऐसे येवतावर आले. दुसरे दिवशीं षष्ठी बुधवार ह्मणोन श्रीमंतांची व त्याची भेट जालो नाहीं. भुलेश्वरास श्रीमंत जाऊन मात्र माघारे आले. गुरुवारी सप्तमीस वाटेनें चालतां त्यांच्या भेटी घेऊन मुक्कामास पाटसच्या तळ्यावर गेले. रविवारी राजश्री महादोबाबाबा सासवडास गेले ते समयी शिक्केकट्यार राजश्री शामराऊ बाबा याचे हवाली करून गेले. मंगळवारी राजश्री शामराऊबाबा पुणीं येऊं लागले. तेसमयीं शिक्केकट्यार राजश्री नारोपंत नाना याचे हवालीं करून पुणियास आले.
श्रावण वद्य ७ बुधवारीं दोन तीन घटका रात्र अवशीची जाली होती ते समयीं राजश्री महादोबाबाबा याची स्त्री धाकटी सौ। रमाबाई यास देवआज्ञा सासवडीं जाली. १
श्रावण वद्य ८ शुक्रवारीं आनंदराऊ मोकाशी याजला देवआज्ञा जाली. गुरुवारची पहाटेची सात आठ घटका रात्र होती तेसमयीं वारले, परंतु सकाळ उठोन शुक्रवारी दहन केलें.
भाद्रपद शुद्ध ६ बुधवारी कोनेर त्रिंबक एकबोटे याची स्त्री सौ। आनंदीबाई ईस देवआज्ञा जाली. प्रातःकाळचा पांच सहा घटका दिवस आला होता तेसमयीं.
त्रिंबक गोपाळ याजला चिंचवडी देवआज्ञा जाली. भाद्रपद शुद्ध ( कोरी जागा ) जाली. बरें कांहीं दिवस वाटत नव्हतें.