अधिक वद्य १३ रविवारींच दादंभट्ट धर्माधिकारी यास पाटशीं देवआज्ञा जाली. बायको अगर लेक कोण्ही जवळ नव्हती. दोप्रहरा दिवसा जाली. धाकटा लेक जयराम जवळ होता.
आषाढ शुद्ध ७ बुधवारीं राजश्री विसोबा याची स्त्री आवडी इजला रोज मजकुरीं संध्याकाळचा चार घटका दिवसा देवआज्ञा जाली. विसोबा वैद्य याचें बुडालें. १
आषाढ शुद्ध १० गुरुवारीं अवशीची अकरा घटका रात्र जालीं होती तेसमयीं राजश्री बाळाजी पंडित प्रधान हे मोहुर्तेकरून स्वारीस जावया निघोन, राजश्री त्रिंबकराऊ विश्वनाथ याचे घरीं बारावे घटकेस येऊन राहिले. घरींहून निघाले तेसमयीं मोहूर्त चांगला जाला. दिवस उगवून शुक्रवारीं राजश्री भाऊ, दादा व रामचंद्रबावा सासवडास राजश्रीं बाबाचे समजावीसीस गेले. महादोबांनीं च्यार हजार फौज ठेवावी, सुरत आटावीशींत पांच लाखाचा मुलूख वसुली सरंजाम द्यावा, महपिलीकडे साडेती लाखांचा द्यावा, पुणेदेशची मुतालकी महादोबाच्या पुत्रास द्यावी पुरंधर देखील, महादोबास पहिले चाळसा हजाराचा सरंजाम माळवियांत वगैरे दिल्हा आहे, आणीख साठ हजारांचा सरंजाम देशीं व गंगाथडीस द्यावा, सदाशिव त्र्यंबक यास हुजूरची राजश्रीपाशील मुतालकी आहे त्याजलाही कांहीं सरंजाम द्यावा, धोंडो मल्हार याजला कांहीं सरंजाम द्यावा, ऐशी बोली आहे. करारमदार जाले आहेत. परंतु घडोन येईल ते खरें. १
राजश्री मल्हारजी होळकर व जायाजी शिंदे दोन वरसें माळवियांत गेले. अटकेपलीकडून पठाण दिल्लीवर येणार होता, याजकरितां पातशाहानें कुमकेस बोलाविलें. गेले. पठाण दिल्लीवर आला नाहीं. मीर मनूपासून पैका घेऊन गेला. माघारा मल्हारबा पातशहाच्या बोलें गेले. ह्मणून ते मेहेरबान होऊन आपले पातशाहींत दरोबस्त चौथाई दिल्हे. अगरें अजमिर दोन सुभे दिल्हे. आठ लाख रुपये रोख दिल्हे. सत्रा लाखांची वरात दक्षण सुभियावर दिल्ही. दक्षणेंत गाजुद्दीखान सुभा मल्हारबा घेऊन आले. त्याणें बर्हाणपुरसुद्धां आपले तर्फेनें व जुन्नर सरकार, संगमनेर सरकार, दर्गानाशिक दिल्हे आहे. याजकरितां पेशवे सलाबतजंगावर जाणार. त्याचा पराभव करणार. गाजुद्दीखानाची स्थापना करणार. याजकरितां बाहेर प्रस्थान निघालें. यांचें नशीब अधिक आहे. करित तें होतें. पुढें काय होऊन येईल तें पहावें. यांचा प्रताप मोठा चालिलो आहे ! १