श्री.
स्मरण सन्न हजार ११६२, शके १६७४, अंगिरानाम संवछरे. जेष्ठमास.
जेष्ठ वद्य ९ मंगळवारी मातुश्री ताराऊसाहेब यानी धोंडो कृष्ण व माधवराऊ दि॥ राजश्री पंत प्रधान सातारियामधें जाऊन राजश्रीच्या चवकीस लोक होते त्याजला फितावून, पैका व कडीं देऊं करून, राजश्रीस काहाडून आणावें, ऐसा करार जाला. हे वर्तमान आईसाहेबास कळलियावर बातमी लावून उभयतां कारकूनास धरून, कैद करून, वर्तमान पुसिलें. त्यानीं सांगितले की, आपल्यास श्रीमंत राजश्री भीऊनीं या मजकूरावर पाठविले. राजश्री नानास कांहीं वर्तमान ठावकें नाहीं, ऐसें सांगितले. मग त्या कारकूनाबरोबर पंचवीस राऊत व हुजरे देउन येथे श्रीमंताकडे पा। कीं, हे कर्म तुमचीं आहेत, हे ब्राह्मण तुह्माकडे पाठविले आहेत, याजला काय शासन करणें असेल तें करा. ह्मणोन सांगेन पा।. त्यास, ते ब्राह्मण वोंकारेश्वराचे देवळीं राहिले. श्रीमंताची त्यांची भेट जाली नाहीं. रोजमजकुरी देवळींच होते. याप्रा। वर्तमान जालें ह्मणोन बोलतात. कोण्ही ह्मणतात खरें. कोण्ही ह्मणतात लटकें. याप्रा। आहे. खरे किंवा लटकें हें कांहीं कळेना.
जेष्ठ वद्य १३ मंदवारीं धोंडो कृष्ण व माधवराऊ हे श्रीवोंकारेश्वराचे देवळीं राहिले होते. त्यास देवळांत पाया पडावयास गेले. भोंवते ताराऊ साहेबाचे लोक होते. इतकियांत नजर चुकावून पळोन गेले. हें कांहीं ठिकाण लागलें नाही. हें वर्तमान श्रीमंतास कळलियावर श्रीमंतानीं राऊत व खासबारदार व बाणदार वगैरे लोक शोधास पा।. व गांवाभोंवताल्या चौकिया बसविल्या. बाहेरील माणूस आंत येई. परंतु गांवांतील बाहेर जाऊं न देत. याप्रा। संध्याकाळपावेतों जालें. संध्याकाळीं चौकी उठविली. ठिकाण लागलें नाहीं. याप्रा। वर्तमान जालें. १
जेष्ठ वद्य ३० सोमवारीं राजश्री अंताजीपंत फडणीस याजला सकाळच्या प्रहरा दिवसांत देवआज्ञा जाली. बरें कांहीं दिवस वाटत नव्हतें. प्रातःकाळीं तीन घटका दिवस आल्यानंतरी प्रतिपदेस वारले असेत.
अधिक आषाढ शुद्ध १५ सोमवार राजश्री राघो विनायक याजला पुत्र जाला होता. तो सावे रोजीं रोजमजकुरीं वारला, संध्याकाळीं.