छ ३० जाखिर जेष्ठ शुद्ध २ सोमवारी राजश्री नारो आप्पाजी पाडळीकर याच्या वडिल्या भावाची बाबाची लेक राजश्री बाबुराऊ दत्तो महाशब्दे याच्या पुत्रास दिल्ही. लग्न सतरा घटका रात्रीचें, मु॥ पुणे. तैसेंच राजश्री आप्पाजी मल्हार धडफळे यांनी आपल्या धोंडीचें लग्न रोजमजकुरींच केलें. शरीरसंबंध त्रिंबक गोपाळ दि॥ श्री याच्या भावास दिल्ही. याप्रों। रोजमजकुरी लग्नें जालीं. १
जेष्ठ शुद्ध ७ मंदवारीं नवदाहा घटका रात्र अवसीची जाली होती तेसमई खंडो विसाजी देशपांडे यास देवाआज्ञा जाली. दोन तीन महिने बरें वाटत नव्हतें.
जेष्ठ शुद्ध ९ रविवारी संध्याकाळी चार घटका रात्र जाली होती, ते समई राजश्री गोविंदराऊ बिन्न अडबोजीनाईक शितोळे देशमुख यांची धाकटी लेक उमर वरसें अकरा बाराची होती तिजला उमाबाई दाभाडियानीं येऊन साखरपुडा घातला. राजश्री सेनापतीस केली. लग्न शुद्ध ११ मंगळवारी तळेगांवीं जालें. नवरी तेथेंच नेली. मातुश्री लाडूबाई व देशमुख लग्नास गेले. शुद्ध १० सोमवारी.
जेष्ठ शुद्ध १० सोमवारी राजश्री शिदोजी नरसिंगराऊ शितोळे देशमुख याजला टिळा आणिला. मातुश्री उमाबाईनी आपल्या कारकुनाबरोबर पा।. त्याच्या कारकूनास तेच समईं वस्त्रें दिल्हीं. सकाळ्या दिढा प्रहरांत विध उरकला. १
जेष्ठ शुद्ध द्वादशी बुधवारीं. संध्याकाळचा तीन चार घटका दिवस होता तेसमई श्रीकेदारेश्वराच्या देवाल्याच्या शिकरावर वीज पडली. शिकर थोडेसें जाया जालें. चुनाहि थोडासा पडिला.
जेष्ठ शुद्ध १३ गुरुवारी श्रीमंतानी केसानदेस गाइनें वासरूं वितेसमईं खाल्ले होते, त्याचे शांतीला करावयास ब्राह्मण पाटविले.
जेष्ठ शुद्ध ४ बुधवारीं श्रीमंत राजश्री पंत प्रधान यांचे पुत्र विश्वासराऊ राजश्री जानाजी निंबाळकर याचेथें लग्नास गेले होते ते रोजमजकुरीं आले. १
शुद्ध १२ गुरुवारी राजश्री यमाजी शिवदेव याजला श्रीमंतांनी सातारियास मातुश्री ताराऊसाहेबकडे पा।. १