मार्गेश्वर शुद्ध दशमी रविवारी राजश्री सेनापति व सेनाखासखेल ऐसे सणवारचे रात्रीं पळाले. कोन्हीकडे गेले हें कळलें नाहीं. १
रोजमजकुरीं सोभाग्यवती गोपिकाबाई श्रीमंत राजश्री बाळाजी पंडित प्रधान यांची स्त्री श्रीमंताकडे लश्करास गेली. वरकड बायका कांहीं पुरंधरास गेलिया. पेशवियाची वस्तभाव सिंहगड व पुरंधर येथें गेली. वस्तभाऊ गडोगड पळविली. १
शुद्ध १२ सह १३ मंगळवारी राणचा वाघ पुणियांत गांवांत आला. नथुगौडा याच्या घरांत लपाला. एक दोन माणसें जाया थोडींबहुत केलीं. मग मारिला. खड्या होता. रोजमजकुरी लोकें पार पळोन गेलीं. १
मार्गेश्वर शुद्ध १४ बुधवारीं श्रीमंतांनी मोंगलाशीं थोडीबहुत लढाई केली. चिमणाजीबापू शेणवाई ठार पडले. मसणाजी जगताप राजे वडिकर, सटवोजी जाधवाकडील, मोंगलाच्या फौजेंत घोडा पडोन सांपडला. समशेरबाहादूर यांच्या घोडीस भालियाची जखम लागली. पारनेरानजीक जुंझ जालें. १
शुद्ध १५ पुर्णमेस दिवसा झटापट जाली. रात्रीं ग्रहण लागतेसमई मोंगलाकडील छापा, श्रीमंत नानास स्नानास गेले तेथें, आला. गारदी व फिरंगियानी दारूगोळी, बाण यांचा मार फार दिधला. हे उधळीन निघाले तेसमई तारंबळ जाली. माणूस जाया जालें नाहीं. दुरून
आरब सुटला. जवळ मिळाले नव्हते. त्याजमुळें खंड जाली.
वद्य ६ बुधवारीं मलठणच्या मुक्कामावर श्रीमंताचें व मोंगलाचें जुंझ भारी जालें. नंदुरबारचा मोंगल पछाडीस होता. रहदारीने चालतां मधे खिंड पडली. तिजवर घालवून सारा लुटला. चार हत्ती आणले, व पांच सातशें घोडे आणिले. लोकहि मारिले. ते समई खंडोजी निगडे याजला जखम लागेन ठार पडिले. १
माघ शुद्ध १२ शुक्रवारीं येशबंतराऊ बिन्न गोविंदराऊ शितोळे देशमुख प्रा पुणें यास देवआज्ञा जाली. त्याची क्रिया त्रिंबकराऊ बिन्न बाबूराऊ देशमुख यानीं केली. १
माघ वद्य ११ शुक्रवारीं खंडो रघुनाथ यांची स्त्री सखूबाई यास देवआज्ञा जाली.
राजश्री आप्पाजी मल्हार धडफळे यांचा पुत्र पाहिला दादू याचें लग्न चिंचवाडो फाल्गुन वद्य ११ मंदवारीं जालें. शरीरसंबंध राजश्री कोनेर त्रिंबक एकबोटे यास केला. त्याची कन्या दुसरी.