वद्य ११ शुक्रवारीं श्रीमंत राजश्री बाळाजी पंडित प्रधान व राजश्री सदाशिवपंतभाऊ असे मोहुर्तेकडून निघोन पहाटेस बाहेर गेले. राजश्री गोविंदराऊ बिन्न अडबोजी शितोळे देशमुख याच्या भांबोडियाच्या शेतांत जाऊन तेथें डेरे देऊन राहिले. शेत सारें लुटलें. त्याचे रु॥ १५० गोविंदरायास दिल्हे.
कार्तिक शुद्ध १ बुधवारीं दिपवाळी. संतबा देशमुख याणी आपला पुत्र यशवंतराऊ यास घरी दिल्ही. कारकून कोण्ही बोलावले नव्हते. गोविंदराऊहि गेले नव्हते. त्याणींच मनस्वीपणें दिल्हा.
मातुश्री ताराऊसाहेब याजकडे श्रीमंत राजश्री बाळाजी पंडित प्रधान याणीं मधेस्तीस राजश्री धोंडो गोविंद वकील व राजश्री महादाजी नाईक निंबाळकर व राजश्री दिनकर महादेव, ऐसे सातारियास किल्ल्यावर पाठविले होते. त्यास, ते तेथें जाऊन त्यांचें व यांचें बोलणें काय जालें हें कळेना. परंतु मातुश्री ताराबाई व राजश्री ऐशी कार्तिक शुद्ध ५ रविवारीं दोप्रहरा दिवसा किल्ल्याखाली उतरोन राजश्री फत्तेसिंगबावाच्या वाडियांत जाऊन राहिली.
कार्तिक वद्य ( कोरें ) राजश्री दमाजी गायकवाड यासी आवजी कवडियाच्या वाडियांतून काहाडून चिंतो गणेश देशपांडे यांच्या वाडियांत नेऊन ठेविले.
कार्तिक रुजू मार्गेश्वर शुद्ध ७ गुरुवारीं दमाजी गायकवाड याजला चिंतो गणेश देशपांडे याच्या वाडियांतून काहाडून लोहगडावर ठेवावयास रवाना केले. व रोजमजकुरींच श्रीमंत राजश्री बाळाजी पंडित प्रधान यांच्या व राजश्री दादोबा प्रतिनिधी यांच्या भेटी बहूळचे मुक्कामीं जाल्या. व राजश्री महादाजी अंबाजी पुरंधरे हे मुलेंलेकरें घेऊन रोजमजकुरीं स्वार होऊन जेजूरीस देवदर्शणास गेले. तेथून देवदर्शण करून सासवडास येऊन मग श्रीमंताकडे लश्करांत जाणार.