शुद्ध ११ बुधवारी राजश्री रामाजी रंगनाथ व विनाजी रंगनाथ वाळवेकर यांजला निरोप दिल्हा. नारोपंतीं रामाजी गोपाळ याजपासून करीना रामाजीपंत उठोन गेलियावरी लेहविला. हजीर मज्यालसीची नांवे घालविली. त्याजवर जगोबाच्या हातें त्याचें नांव लेहविलें. वरकटांचींहि लेहविलीं. खालता उदंडच मजकूर लिहिला. गतवर्षीच्या नवरात्रांत वाल्हियांत व सिधेश्वराच्या देवळीं माहोछाव होत होता, तेथें रामाजीपंताचे नातू व विनाजीपंताचे नातू पाहावयास गेले. यांची कटकट जाली. विनाजीच्या नातानीं त्याजला काठी मारली. तो दाहावे रोजीं वारला. जगोबा ह्मणून त्याची आई व भाऊ पेशवियापाशी फिर्याद जाली. यांस अटकिलें. रामाजीपंतांनी विचार केला कीं, विनाजीचे सोयरे मातबर, त्यांचे भिडें आपलें कोण मनास आणतो? गोही कोण पाहतो? पाहिली तरी कोण देईल ? ऐसें चित्तांत आणून निरोप घेऊन गेलें. खंड बालेसरामधें पडोन विनाजीपंतास रामाजीपंतास एक करून निरोप देविला.
छ १६ सवाल भाद्रपद वद्य २ मंगळवारी राजश्री जानोजी निंबाळकर महाराऊ श्रीमंत राजश्री बाळाजी पंडित प्रधान याजकडे मध्यस्तीस आला आहे.
श्रावण शुद्ध ३ बुधवारी पाहटे दिवस उगवतां बुधवार राजश्री महादाजी अंबाजी पुरंधरे राजश्री नानाकडे, भाऊकडे, जाऊन आले. तिसरे प्रहरीं बोलावून नेले. सदरेस कारभारास बैसले होते. समजावीष बाबाची जाली, अगोधर आठ चार रोज मध्यस्ती होत होती. रोजमजकुरीं एकत्र जाले.
आश्विन शुद्ध ९ मंगळवारीं श्रीमंत राजश्री बाळाजी पंडित प्रधान राजश्री महादोबाबाबाचेथें संध्याकाळच्या प्रहरा दिवसास गेले. ते मधरात्रीस फिरोन आपल्या वाडियांत आले.
शुद्ध १० बुधवारीं दसरियास श्रीमंताबरोबर माहादोबाहि शिलंगणास गेले होते. दसरियाची वस्त्रेंहि दिल्हीं. मुरार गुंडाजी पेशपांडे यानीं पालखी केली. १
आश्विन वद्य ८ मंगळवारी चांबळीच्या सेडकराच्या पाटिलकीच्या महजराबर देशमुखानीं शिक्का करून दिल्हा. त्याजपासून काय घेतलें हें कळलें नाहीं. शिक्का करून महजर ता। मालोजी.
आश्विन वद्य १० गुरुवारीं रात्री बाळाजी पंडित प्रधान एकलेच माहादोबा बाबाचेथें गेले होते.