श्रा। वद्य ३ सोमवारीं श्रीपतराऊ बापूजी याच्या कचेरीस पाहारेचें दिव्य मथुरा कोल्हालीण, मौजे कानगांउ, इजपासून घेतलें. दिवीं उतरली. तिजवर, तिची जाऊ गोडाई परंतु नात्यानें सासू, तिजवर, माणका चांभार कानगांवकर यासी जात्यात ह्मणून त्याचेच घरचे पालक लेक नरसा व माहादा हे ह्मणों लागले. परंतु दृष्टीनें पाहिलें नाहीं. ते अटकेस आहेत. कोल्हालियास दोनशें रु॥ खंडले. चांभारांनी देवास शिवून शेंदूर भोगविला ह्मणून सव्वादोनशे रु॥ खंडले. शंभरेक रु॥ अगोदर मसाला घेतला होता. माणका चांभार याजला पागोटें दिल्हे. निरोप सर्वांस दिल्हा असे.
वद्य ३ सोमवारी पेशवे थेवरास गेले. मंगळवारी चतोर्थी जाली. बुधवारीं मु॥ जाला. गुरुवारी पुणियास आले. उमाबाई दाभाडीहि बा। गेली होती. १
भाद्रपद शुद्ध प्रतिपदेस श्रीदेव चिंचवडाहून मोरेश्वरास जावयास पुणियास आले. संगमीं राहिले. पाऊस लागला. दुसरे रोजी लोणीस गांवांत मलबा कुलकर्णी याचेथें जाऊन राहिले. तिसरे रोजी पिसावियावरी राहिले. चतोर्थीस मोरेश्वरास गेली. पाऊस दोन रोज फार फार लागला यात्रेची तारांबळ फार जालीं. पंचमीच्या महानैवेद्यावर पोळ्या घालाव्या. त्या विसरले होते. आयते वेळेस नाहींतश्या कळलियावरी आणिल्या. श्रीनीं चिंचवाडाहून निघतां वहाणा बराबर घेविल्या होत्या. अन्न पुरलें. तोटा आला नाहीं. १
भाद्रपद शुद्ध ५ गुरुवारी रात्रीं धोंडो नामदेव कडेदेशपांडे, कर्यात मावळकर, यांस देवआज्ञा जाली. पुणियांतच वारले. गदाधरभट्ट ढेकणे यांचेथें राहून औषधउपाय करीत होते. गुणास न आलें. शेवट जाला असे.
शुद्ध १० मंगळवारीं एकबोटियाणीं कावडीच्या निम्मे पाटिलकीचा महजर करून घेतला. तो श्रीपतराऊ बापूजीच्या कचेरीस आणिला होता. त्याजवर तान्हाजी सोमनाथ हवालदार हवेली सांडस याचा शिक्का करून देविला.
शुद्ध दशमी मंगळवारी विश्वनाथ जोशी राहीरकर यांणीं आतुरसंन्यास घेऊन पुण्याच्या संगमीं जीतच नदींत जाऊन जलसमाध घेतली. वारले. १