श्रावण शुद्ध १ शुक्रवार.
शुद्ध चतोर्थी सोमवारीं मातुश्री राधाबाई, पेशवियांची आजी, यांची तुळा पुणियांत केली. रुपये घातले होते. १
राजमाचीस लटका राजा ठेविला होता. तो सातारियास रामराजियाकडे पाठविला होता. तो लबाड. त्याजला डाग देऊन, डावे हातची करंगळी तोडून, पांच पाट काहाडून, त्याजला बाहेर घातला. त्याजबराबर गोसावी होती त्याचा हात कापला, भोई होता त्याचे कान कापिले. तोतयानें सांगितलें की, मी आहीररायाचा. माझे नांव संताजी. माझ्या बापाचे नांव संभाजी आहीरराऊ. मजला यशवंतराऊ प्रभूनीं व आणख्यांनी भर देऊन, राजा ह्मण ह्मणून, सांगितले. ऐशी सातारियाहून खबर आली. १
शुद्ध ६ षष्ठी बुधवारी श्रावणमासची दक्षणा पेशवियांनी फार फार दिल्ही. पंडितांस अगोदरीचे सुवर्णयाचे सोने दिल्हे होते. बुधवारी दोनप्रहरापासून दक्षणा द्यावयास आरंभ केला. सारी रात्र देतच होते. दुसरे रोजीं चार सहा घटकापर्यंत दक्षणा देतच होते. अडीच लक्ष रु॥ वांटिले. १
नागपंचमीचे संधीस ताराबाईनी सातारचा हवलदार आनंदराऊ जीवेंच मारिला. त्याजपासून काय अंतर पडले असेल तें असो !
श्र॥ शुद्ध ८ शुक्रवारीं बाबा वैद्य याणीं खंडू तेलियाच्या जागियावरी नवें घर बांधले. त्या घरास ग्रहप्रवेश केला असे. १
रोजमजकुरीं गायकवाडास निर्बंध पेशवियांनी फार केला. त्याचें मनुष्य त्याजवळ राहूं दिल्हे नाही. आपलींच माणसें चाकरीस दिल्हीं. १
षष्ठीस शिराळशेट, मांजरी बु॥ येथील बापूजी पाटलाचा, खाले आळीच्या घुलियानी द्वाही देऊन पारवर अटकाविला. तीन चार रोज होता. हवलदार गांवास गेले. त्याणीं त्याचा त्याजकडून नदींत टोकविला असे. १