वैशाख वद्य १३ मंदवारीं रूपगीर गोसावी, गणेशखिंडीच्या विहिरीपाशील, याणें जिता संध्याकाळीं पासणियांत देवळावरती रामगंगेचे पछमेस समाध घेतली. त्याजला भोंबाडकरांनी दोन बिघे विहिरीपाशीं जमीन व गांवाजवळ तेहत्तीस हात घरास जमीन दिल्ही होती. ते त्याणें शिवरामभट चित्राव याचा लेक कृष्णंभट आला आहे, त्याजला कागद दिल्हे. दानधर्म करून समाधी घेतली असे.
जेष्ठ शुद्ध तृतिया गुरुवारीं सेनापती व खासखेल व उमाबाई ऐसी पुणियास इंद्रोजी कदम घेऊन येऊन मल्हारजी होळकर यांच्या वाडियांत आणून ठेविलीं असेत. १
दाभाडियास व गायकवाडास शिधापाणी सरकारांतून देत असेत.
श्रीमंत राजश्री पंतप्रधान सातारियांत होते. मातुश्री ताराबाई यांचे राजकारण मनास आणावयास राहिले. परंतु, ती अद्याप गडाखाले येईनात. राजश्रीस पाठविनात. मग हे कुच करून जेष्ठ शुद्ध ९ बुधवारी सत्रा घटकेस पुणियास आले. तिसरे प्रहरीं राजश्री महादाजीपंत बाबा वाडियांत जाऊन, भेटी घेऊन, सवेंच आपल्या वाडियांत आले. १
रोजमजकुरी चिरंजीव लक्ष्मणास समाधान होईनासें जालें.
जेष्ठ शुद्ध १५ सह १ शुक्रवारी चंद्रग्रहण पडिलें.
जेष्ठ वद्य ३ शुक्रवार सन ११६१ छ १६ रजबू अवशीचे रात्रीं श्रीमंत व भाऊ महादोबाच्या घरास समाधानास आले असेत. १
वद्य पंचमीसह षष्ठी सोमवारीं श्रीमंत सिंहगडास गड पहावयास प्रथमच गेले असेत. १
सवेंच तेच रोजी तिसरे प्रहरीं आले असेत. १
शुद्ध रुजू वद्य ३ शुक्रवारीं मावळे दावडीच्या बंदोबस्तास पाठविले होते. नारायणराऊ, गोविंद हरीचे पुतणेहि, पागा पाठविली होती. त्याणी गायकवाडाचा जामदारखाना उघडून कापड वगैरे चोरिलें. ठिकाणीं लागले. ह्मणून रोजमजकुरी मावळियाचे हात तोडिले. कोरडियानें मारिले. नारायणरायास रागास आले. हसमाचे कारकूनहि तिघे होते त्यांस मार दिल्हा.