शके १६ ७३, सन ११६०,
प्रजापतिनाम संवत्सरे,
चैत्र शुद्ध प्रतिपदा,
रविवार.
शुद्ध ६ गुरुवारी, सुभानजी बिन्न सटवोजी जाधवराऊ वाघोलकर यास सममालकीचे शिक्की याजसी देशमुखाचें पत्र दिल्हे कीं, तुह्मी पेरणाची शेरीबाग लावावयास मागितली, तरी ते शेरी तुह्मांस दिल्ही असे, बाग लावणें. बहिरोबाचें दस्तूरचे पत्र असे. बाईनीं वाघोलीस त्यास देऊं केली. त्याणी माणूस पाठविले. त्याजवळ पत्र दिल्हें असे. १
चैत्र शुद्ध ८ मंदवारीं श्रीमंत राजश्री बाळाजी पंडित प्रधान यांचा चौथा पुत्र लहान होता त्यास का। मजकुरी देवआज्ञा जाली.
रोजमजकुरीं सातारियामधें राजश्रीच्या हुजरांत बर्हानजी मोहिते, व फरादखान, जाधव वगैरे यांशीं व श्रीमंताकडील मानाजी पायगुडे वगैरे यांशी जुंज झालें. परस्परें जखमी जाले.
चैत्र वद्य ५ गुरुवारी शिवरामभट चित्राव पासणियांत रात्रीं वारले. बोलत होते. १
आप्पाभट पंढरपुरे चिंचवडीं तेहि वरचेवर वारले. वद्य. ( कोरें ).
वैशाख शुद्ध १० सह ११ बुधवारीं श्रीमंत पंतप्रधान फौजेसुद्धां भागानगराकडून सातारियास दाखल जाले. गुरुवारी येवतेश्वरावर व गणेशखिंडीकडे फौजा रवाना केल्या. येवतेश्वरावर आईसाहेबांची व गायकवाडाची चौकी होती ती उधळली. गायकवाड महारदरियांत राहिला होता. त्याजवर बाण व जेजाला यांचा मार केला. गायकवाडाचे बुणगे व किरकोळ लोक गडाच्या कडाणीस गेले. हजार बाराशें गायकवाड उभा राहिला मरावयास. श्रीमंत व भाऊ फौज तयार करून चालोन घेतले. यांची फौज भारी. त्याचा परिणाम होईना. तेव्हां गायकवाडाकडून भेटीचा मजकूर जाला. यांजलाहि विचार पडला की, तो मरावयास तयार जाला, बहुतांचा नाश करील. मग सटवोजी जाधव, जानोजी ढमढेरे, शिदोजी राऊत, नाना पुरंधरे, रामचंद्रबावास पाठविलें. गायकवाड भेटीस आला. भेटी घेऊन आपल्या गोटांत गेला. दुसरे रोजी याणीं गायकवाडास सांगोन पाठविलें कीं, गोटाशेजारी वेणेवर येऊन राहा. त्याजवरून वेणेवर दक्षणतीरीं येऊन राहिला. श्रीमंत उत्तरतीरीं राहिले. सेनापतीहि गायकवाडाबा। आले होते. गायकवाडास ह्मणों लागले पंचवीस लक्ष रु॥ व निम्मे गुजराथ वांटणी दे. त्याणे ह्मटलें उमाबाई धणी आहेत. त्यासी जें बोलणें तें बोला. उमाबाईकडे गायकवाड जाऊन शिक्केकटार त्याजपुढें ठेविलीं. दाली सोडली, ह्मणून बोलोन आपल्या डेरियांत गेला. चौथे रोजीं मंगळवारी सकाळींच श्रीमंतानीं फौजा पाठवून गायकवाड लुटला. त्याणें स्नान केलें होतें. तयार नव्हता. नाना बेवसवास होता. यांची फौज जाऊन घोडी वोढूं लागली. गायकवाड ह्मणों लागला, त्याच्या वचनावर आपण बेवसवास होतो, त्याणीं वचन सोडून हे गोष्टी करूं लागले तरी कोणी हत्यार धरूं नका, सुखरूप लुटूं द्या. मग यांणीं अगदीं गोट लुटला. गायकवाड दोघे भाऊ विठ्ठल शिवदेव याणीं आपल्या डेरियास नेले. सेनापति मानाजी पायगुडियानीं आपल्या डेरियांत नेले. गायकवाड पायउतराच गेले. जैशिंग बरगियाच्या डेरयास नेले. अवघ्यापासीं चौकिया ठेविल्या. गायकवाड तिघे भाऊ एकत्र केले. सेनापति श्रीमंताबा। उमाबाई अंबिकाबाई होती, खासखेल होते, त्याजपाशीं नेले. दाभाडियानी अवघी गुजराथ पेशवियांच्या हवाला केली. त्याप्रा। गायकवाडानींहि देविली. ठाणीं गोंदे, वजपूर व दावडी गायकवाडास राहावयास दिल्हीं. त्रिवर्ग गायकवाड पुणियास पाठविले. वैशाख वद्य १३ शनवारीं पुणियास आले. आवजी कवडियाच्या वाडियांत ठेविले. चौक्या भोंवताल्या ठेविल्या. ठाणीं आलियावरी सोडावें. याजकरितां अटकेस ठेविले आहेत. गायकवाडाचा वडील पुत्र पेशवियाबा। उमाबाईपाशीं होता. तो येतांना मंगळवेढियांत पाठविला. गायकवाडाजवळ दोघे मुलें होतीं, तीं आईसाहेबापाशीं सातारियावरी ठेविली होती. ती तेथेंच आहेत. ऐशी हकीकत जाली असे. १