फाल्गुन शुद्ध ११ एकादशी सोमवारीं पेशवियांची फौज, बापूजी बाजीराऊ, गायकवाडावर चालोन जाऊन जुंझ केलें. जुंझ निबर जालें. पेशवियांची फौज निघाली. गांधणीवर जुंझ जालें. इकडील निशाणाचा हत्ती व नगारियाची हत्तीण वगैरे दोन हत्ती ऐसे चार गेले. अबदागीर व पालख्या व घोडीं कांहीं गेलीं. रंभाजी पांढरे व दत्ताजी भापकर पडले. शाहाजी भापकर यास जखमा आहेत. वगैरेहि पडले. जखमी जाले. गायकवाडाकडील जगजीवन पवार याच्या निशाणाचा हत्ती बोंधियांनी आणिला. दादजी माणकर, खंडोजी माणकराचा लेक, पडिला. वगैरे पडिले. जखमी जाले. ऐसे वर्तमान जालें असे. १
फाल्गुन वद्य ३ सह ४ सोमवारीं वाघोलीस सटवोजी जाधवाचे राखेची लेक यमाई इचें लग्न जालें, मानाजी आंगरे याच्या राखेच्या लेकास दिल्ही.
वद्य ६ गुरुवारीं गायकवाड अज-बोटियावरी आलाशी खबर आली. तेच रोजीं संध्याकाळीं पुणें पळालें. पहांटे मातुश्री राधाबाई व काशीबाई सिंहगडास गडास गेली. शुक्रवारी केंदरावर गायकवाड आला. बापूजी बाजीराव पेशवियाची फौज लोणीधामणीवर आली. मंदवारीं गायकवाडास मु॥ जाला. राजश्री येशवंतराऊ दाभाडे सेनापति इंदुरीहून केंदरावर गायकवाडापाशीं आले. रविवारी तळेगांव गाधाडीखाले निंबगांवाकर मु॥ केला. सोमवारीं. साळेमाळेच्या पारगांवावर मु॥ जाला. मंगळवारी येथून तिसरे प्रहरी त्र्यंबकराऊ विश्वनाथ आपले फौजेत जावयास गेले. रात्रीं त्रिंबक सदाशिव पुरंधरे साताराची फौज घेऊन, सासवड ठेवून, पुणियास आले. महादाजीपंतबाबाची भेटी घेऊन, बुधवारी सकाळचे माघारे फौजेकडे गेले. रात्रीं पहिले प्रहरीं त्रिंबकराऊ माघारे घरास आले. नाना पुरंधरे फौजेबरोबर गायकवाडामागें गेले. फाल्गुन वद्य चतोर्देशी शुक्रवारीं वेणेजवळ यांचे त्यांचे जुंझ जालें. गायकवाडांनी याजला पहिलियानें मागें सारिलें. मग यांणी लगट केला. गायकवाडाचा मोड केला. त्याचे बुणगे गोटावर होते तितके याणीं लुटिले. घोडी, डंट, पालख्या, बैल, ढोरें, डेरे, राहुट्या, आणिल्या. सडी फौज, गायकवाड व सेनापती सातारियांत शहरांत गेले. महारदरियांत जाऊन राहिले. मंदवारीं संध्याकाळीं पुणियास खबर आली. तोफा केल्या. अंबाजी शिवदेव, विठ्ठल शिवदेव याचे बंधू, पडिले. पेशवियाकडील आणीखहि कांहीं पडिले. फिरंगोजी पंवार, हणमंतराऊ निंबाळकराकडील, याणीं व गोपाळराऊ प्रतिनिधीकडील व बापू चिटनीस यांणीं व पेशवियाची नानापाशील साताराची फौज यांणीं झुंज केले. यांची फत्ते जाली.