रोजमजकुरीं मोरगांवींहून अर्जदास्त आली कीं मोरोजी बिन विठोजी तावरी याचा लेक वेडो, त्यानें आपली बायको जिवें मारून मूठमाती देऊन पळोन गेला असे. १
रोजमजकुरीं पाऊस रात्रौ बरा पडिला. बहुत दिवस पडिला नव्हता. १
आश्विन शुद्ध चतुर्थी शुक्रधारीं +++ भोसले व +++ भोंसले याणी श्री देव चिंचवड यास पत्र पाठविलें कीं, भोसरीची पाटिलकी मान्याने आह्मांस विकत दिल्ही आहे, तेथील मुतालकीस नारो विश्वनाथ पा। आहेत, तर मौजे मजकूरचें पाटिलकीचें कामकाज यांच्या हातें घेतलें पाहिजे, मानपान, टिळाविडा, तसरीफइनाम यास देववणें. ह्मणून पाठविलें असे. १
पौष शुद्ध ४ चतोर्थीस बुधवारीं संक्रांत.
पौष शुद्ध ५ पंचमीस खेडकर कुसमट जोशी याजला पेशवियांनीं कागद करून दिल्हे की, तुमची वाट व मोरी, शामजी हरी खेडकर कुलकर्णी यांच्या वाडियांतून असे. त्यांणीं मोडिली असे. ते पाडणें. पूर्ववतप्रमाणें राहणें. मल्हारजी होळकर याचे भिडेनें इमारतींतून वाट देविली. भटापासून नवशें रु॥ घेतले. शामजीपंतापासून पांचशें रुपये घेतले. भटास पूर्वेस दरवाजा आहे व मोरी काढून द्यावयास जागा आहे. परंतु अट घेऊन बसला. डोये वाढविली. आतत्यायीस आला. मग येणेंप्रमाणें केलें असे. १
शुद्ध ७ शुक्रवारीं राजश्री बाळाजी बाजीराऊ येर्हवडियाच्गा राणांतून कुच करून लोहगांवचे हरणिलियावरी गेले. पुणेदेशचा तहरह, पिलाजी जाधवराऊ याजकडे पाटील गेले होते, त्यांणी मधें होऊन करार करून देविला. गुदस्तास साडे बावीस हजार रुपये सोड दिल्ही. पाऊसपाणी गेलें, याजकरितां मिरासपट्टी श्रावण भाद्रपदमासीं घ्यावी असें केलें असे. १
बणेरांची खंडणी करून जिवाजीपंताकडे वसुलास लाविलें. पुढें जातां जातां केंदूरच्या पाटिलकीचा मजकूर पाडिला होता. गांवडे ह्मणतात आपली पाटिलकी. त्याचा सुरत महजर केला. शेलारें अगोधर दमटली याजकरितां.
कसबे पुणें येथीलही खंडणी जातजातां केली. मुळखडीपावेतों गांवकरी गेले होते. कसब्याच्या महाजनाचें पागोटें दिल्हें नाहीं, पांडूचे कटकटेबद्दल.
पौष वद्य रुजू. शुद्ध १३ गुरुवारीं राणोजी उंदरा वारली, बावाजी पाटील सस्ता, मोसीकर रखमाजीचा लेक, आप्पाजीस दिल्हा होता. तोहि सोनगडाहून आला, पाणी लागोन मेला.
पौष वद्य १ रविवारी कल्याणराऊ पेशवियाच्या लष्कराबराबर अवंघास गेले.
वद्य ६ शुक्रवारीं भगवंतभट्ट धर्माधिकारी मेला.