२० सोनवडकर चौगुलियाचा शिरपाव आपणच घेत. ह्मणून बाबाजी पंवार याजला गुन्हेगारी घेतली.
५०० लोणीकाळभर येथील अंबरोजी थेऊरकर चौ। याजला घेतले. सबब कीं, चोभे थळ वाहत आहे. पथाजी थेऊरकरहि ही निमें वाहत होता. परंतु पथाजीस पोहचतच नाहीं, अजीं सबब.
जुवे खेळत होते ते धरून आणिले. मार दिल्हे. गुन्हेगारी घेतली. त्यांत गोविंद विश्वनाथ देशपांडे याचा मूल नाना होता, तो पळोन गेला असे.
आषाढ वद्य ११ रविवारीं गोविंदराऊ देशमुख यांचे मूळव्याधीचे मोड काहाडले. शस्त्रवैदानीं अगोधर ओखद दिल्हें होतें. त्याणेंच मूत गुंतले होते. शेवटीं मोड काहाडिले असेत.
चिरंजीव लक्षमण वद्य १२ सोमवारीं गांवास सोनगडाकडून आले असेत. १
वद्य १४ मंगळवारीं राजश्री पंतप्रधान याचा वल्हे घोडा बोररतन उगाच वारला असे. १
आषाढ शुद्ध १३ राजश्री स्वामीनीं दादोबा पुरंधरे यास पालखी दिल्ही.
रघोजी भोंसले, फत्तेसिंग भोंसले सातारियास आले. वद्य दशमी मंदवारीं राजश्रीची त्यांची भेटी जाली असे. १
अधिक श्रावण शुद्ध ३ मंदवारीं राजश्री बाळाजीपंत नाना पेशवे मुलूखगिरीहून बारा घटका दिवसां मुहुर्तेकरून घरास आले. पहिली मुलूखगिरी. येचवेळेस सवाई जैसिंगाची यांची भेटी फिरतेसमई जाली. जातेसमईं नवाब निजामनमुलुख यांची भेट जाली होती. १
यांचा बोलबाला जाला. चांगली मुलूखगिरी जाली. देवरी घेतली. गौर झोंबराचें राज्य लुटलें असे. १
अधिक श्रावण शुद्ध ५ सोमवारी छ ४ जमादिलावली रामाजी शिवदेव एकबोटे यास कर्हेपठारच्या गुमास्तगिरीची ताजी सनद शिक्कियानिशीं नारो अनंत याच्या दस्तुरें लेहून दिल्ही. तिची नकल घेतली असे. १
अधिक श्रावण शुद्ध १ गुरुवारी खंडोजी पाटील कोलता पिसावेकर मृत्य पावला. १
शुद्ध नवमी मंदवारीं वर्तमान आलें की, तिमाजी पाटील कटका भिंवरीकर वारला. तीन चार रोज जाले. चांबळीच्या चौगुलकीचें भांडण भांडावयास पुणियास आला होता, दुखण्या पडला तैसाच गांवास नेला, वारला. १
शुद्ध दशमी रविवारी संध्याकाळीं येशवंतराऊ बिन गोविंदराऊ शितोळे, देशमुख, राजश्री फत्तेसिंग भोंसले यांजकडून आले. हत्ती आणिला असे. १
रोजमजकुरी पेशवियांनी, बकरे बेरड जाला होता, तो कुणब्याच्या बायकोशीं गेला होता, त्याची गरदन मारिली असे. १
अधिक श्रावण शुद्ध १३ बुधवारीं दोप्रहरांउपरि राजश्री बाळाजी बाजीराऊ प्रधान व सदाशिव चिमणाजी राजदर्शनास सातारियास गेले.