पंढरपुरची यात्रा आली. नीरेमधें पडवीकर शितोळे यांची तिघें मुलें बुडालीं. दोघी कन्या व एक पुत्र. नगवण होते. भेंडी तुटली आणि बुडालीं. सुभानरायाचा पुत्र व सेटियाजीच्या दोघी लेकी अशी बाजी शितोळे त्याचेथील बुडालीं. १
आषाढ वद्य षष्ठी मंगळवारीं गोविंदराऊ देशमुख यांचे मूत गुंतलें होते. वाखा जाला होता. बरें जालें असें.
आषाढ वद्य षष्ठी मंगळवारी जगोबा फुरसंगीस फिरंगाईच्या दर्शनास गेले होते. १
कुरकुंबीचे फिरंगाईची भक्त गंगाजी हरपळा पंवार फुरसंगीकर याजला होती. त्याजला द्रष्टांत जाला कीं, मी तुझ्याच राणांत तुजसाठी आलें. दुसरे रोजी ओढियाखालतीं जाली होती. स्वप्नांत देखिली होती. तेथे गेला तों पंचरंगी दगड तांदळा पडला आहे. त्याची सेवा करूं लागला. शेंदूर भोगविला. चार पांच वरसे तेथेच पूजा करीत होता. त्यास तें राण फुरसंगीच्या व लोणीच्या शिवेमुळें द्वाहीखालें पडिलें आहे. लोणकर गंगाजीसी पुजापत्रीसाठी कटकट करूं लागले. मग याणे आपल्या शेतांत ओढियाअलीकडे आणून स्थापना केली. कुरकुंबाची फिरंगाई येथेंहि चार पांच वरसें पुजा केली. दोन तीन वरसें जालीं. बरी भराभर जालीं. रोगे येऊन बैसलीं. बरीं जालीं. नवस पुरों लागले. दोनतीनशे माणूस मिळों लागले. कुरकुंबच्यावरीचे येथें गेल्यानें यात्रा घडों लागली. नवें देवस्थान निर्माण जालें. गंगाजी हरपळा पूजा करितो आणि श्रीपुढे येतें तें घेतों. तूर्त गुरव तेथें येत नाहीं. गंगाजीने देवीपाशीं आपल्या शेतांत घर बांधिले आहे, तेथेहि राहतो. तेव्हडियानें गांवांत तो घरच आहे. तेथें देवापुढें ओढियांत पाणीहि लागलें आहे. डव्हरा आहे. विहीरहि केलियाने होईशी आहे. १
वासुदेव जोशी याणी खासगीच्या गांवीं कमावीस केली.
२२०० वरवंडकर पा। चौगुलियाचा शिरपाव आपणच घेऊन आपले घरीं ठेवीत. ह्मणून पाटिलास गुन्हेगारी रु॥ १२०० बाराशें करार केली. जुन्या पाटलाच्या वेळेचा चौगुला शेळका होता. त्याजला हे पाटील मानपान घेऊं देत नव्हते. त्यांचा त्याणीं मानपान घ्यावा ऐसें दिवाणांतून करार करून दिल्हें. त्याजला हरकी रु॥ १००० एक हजार करार केली. एकूण.