श्री.
यादी. स्मरण. सुहूरसन इसन्ने अर्बैन मया अलफ, सन हजार ११५१, छ १९ रा।वल, जेष्ठ वा। ६, रविवार, रोज गुदस्तीं, मध्यरात्रीं म्रुग निघाला, शके १६६३, दुर्मतनामसंवछरे, अव्वल साल. करीने.
आषाढ शुद्ध १६ बुधवारीं रा। रामचंद्र मल्हार शेणवई यांनीं मौजे दौंड ता। पाटस येथील निमे पाटिलकीचें वतन घेतलें. त्याच्या महजरावर शिक्का करावयास गोपाळ शंकर शेणवई, नि॥ मा।र, महजर घेऊन येथें आले. महजरांत मनमाने तैसे मानपान अधिक लिहिले आहेत. हक्क चांभारगोंदियांत राणोजी शिंदियानीं मनास मानेसे करून घेतले आहेत, त्याप्रमाणें या मसुदांत लिहिले आहेत. पंचवीस बंद महजर लांब आहे. दिक्कत घेतलियानें चालेना ऐसें जाणून शिक्के करून दिल्हे. शेटेपण व महाजनकीहि आपल्या व राणोजी पाटील जगदळे यांच्या नांवें लेहून घेऊन त्याजवरहि शिक्का करून घेतला. तूर्त तो त्याणीं कांहीं दिल्हें नाहीं. पुढेंपाठीं काय देशमुखास देतील तें पहावें. महजराची नकल घेतलीसी असे.
रोजमजकूरीं बाळाजी बाजीराऊ प्रधान यांचीं पत्रें चमणनदीवरून आलीं कीं, सवाईची भेटी घेतली, याउपरि मजल दरमजल येऊं देशास. १
रोज मजकुरीं बहिरो कृष्ण, समेत घोडी, गायकवाडीच्या लश्करांतून घरास आले.
आषाढ वद्य चतोर्थी रविवारी महिमाजी बिन जेबाजी पा। घुले, मौजे मांजरी बु॥, ता। हवेली, यास मसाला रु॥ २५, व साखराई कौला, सटवोजी घुला, अनसोजीचा भाऊ, इजला मसाला रु॥ ५ पांच करून, बदअमलाच्या वासपुसीसाठीं राजश्री बापूजीपंत नाना याणीं आणविली. मसाला रदबदली करून निमे करार केला. ते दिवशीं महिमाजीस खोडियांत खातलें. दुसरे रोजीं सोमवारी खंड केला. महिमाजीस गुन्हेगारी, साखरीसी गेला ह्मणून, रु॥ २५० अडीचशें व साखरीस रु॥ ३५ पसतीस, ऐसे खंडिले. महिमाजीस पांचा महिन्यांची मुदत दिल्ही. बायकोसहि दिल्ही. महिमाजीस जमान दिढोश्या रुपयांस तुकोजी बिन्न जैतजी पा। कवडा, घोरपडकर व मांजरीकर भाऊ शंभरांस जामीन जाले. भावांनी पन्नास बुडते देऊं केले. एणेंप्रमाणें निकाल जाला. बायकोस जामीन कृष्णाजी बिन्न बापूजी पा। घुला जाला. तिचें शेत, घर लेहून घेतलें आहे. एणेंप्रमाणें जालें असे. १