आषाढवद्य नवमी रविवारी, विसाजीपंत नि॥ फडणीस स्वारींतून आले. दुसरे रोजी सोमवारी दशमीस राजश्री पिलाजी जाधवराऊ स्वारींतून आले. मातुश्री राधाबाई पेशवे यांची भेट घेऊन वरचेवर वाघोलीस गेले असेत. दतियावोडसें येथील वगैरे सवस्थानें येथील पैको वसूल करून आले. अंतरेवदींत आवजी कवडे पुढे पाठविले होते. स्वारी बरी केली असे. १
आषाढ वद्य दशमी सोमवारी संध्याकाळी मातुश्री चांदूबाई शितोळे देशमुख, गोविंदरायाची स्त्री, यांस पाटसीं देवआज्ञा जाली. रोटीस बरें वाटत नव्हते. मग हरजीबावा बकरा याचे पुत्र याणी डोलींत घालून पाटसास आणिली. तेथें वारली असेत. जवळ हरबा व संतबा, बाळारायाचे पुत्र, मात्र होते. पुण्यांतून कोण्ही गेली नव्हती. अगोदर पुणियास गुरुवारी प्रातःकाळीं वर्तमान आलें. मग सतबा, गोविंदराऊ, दौलतराउ, येशवंतराउ, व मोरोपंत अप्पा, समेत येसूबाई, बाजी कान्हो वगैरे ऐसे पाटसास दिवस घालावयास गेले असेत.
श्रावण शुद्ध १ बुधवारी श्रीमत् राजश्री नानाकडील पत्रें आलीं कीं, माळवियांत छावण्या जाल्या असेत, सुरंजे आसपास. १
श्रावण शुद्ध २ गुरुवारी संध्याकाळीं श्रीमंत राजश्री नानास पहिला पुत्र जाला.
श्रावण शुद्ध नवमी सोमवारी पदाजी पा। जगथाप, चौधरी मौजे बढाणें, ता। कर्हेपठार, याजवर आरोप आला होता कीं, मोही चांभारीण कोम चांभार मौजे मजकूर याची बायको इजसीं कर्म केलें ह्मणून आला होता. त्याबद्दल दोघांस येथें हकीमांनी आणिलें. पुरसीस केली. चांभारीण बोलली कीं मी दिव्य करीन. दिवीं खरी निघालें तर उत्तमच जालें. खरी न निघालें तर साहेबांच्या चित्तास येईल तें करावें. त्याजवरून दिव्य तिजपासून घ्यावें, ऐसा निश्चय जाला. मग राजश्री बापूजी श्रीपत यांणी पेशवियांच्या वाडियांत मातुश्री राधाबाईकडे आज्ञा घ्यावयास बाळाजी महादेव मांडवगणे पाठविले. त्यांनी मातुश्रीस वर्तमान सांगितले. त्यांनी दिव्य घ्यावयास आज्ञा दिल्ही. मग चांभारीण नदीसे स्नान करावयास पाठवून स्नान करून आणिली. हातास साबण लावून हात धुतले. हातची चिन्हें लेहून ठेविलीं. दोन भाते लावून पहार ताविली. सदरहू करिन्याचें भाळपत्र मोही चांभारणीचे कपाळीं बांधिलें. हातास लोणी लावून पहार वरपविली. साहावेळां पहार तिने वरपली. दिव्यीं खरी निघाली. सदरहू दिव्य राजश्री बापूजीपंतनानाचे कचेरीस जालें. दिव्यीं उतरलियाउपर साड़ी-चोळी तिजला नेसविली. आणि कसबाच्या चांभाराच्या हवाली केली. पदाजीचा आरोप वारीला. दुसरे दिवशीं मातुश्री राधाबाईनीं चांभारीण वाडियांत हात पाहावयास नेली. हात पाहिले. मग लुगडें व चोळी तिला दिल्ही.