शुद्ध १२ बुधवारीं राजश्री येशवंतराऊ दाभाडे सेनापती राजश्रीकडून आले. तळेगांवास गेले असेत. १
शुद्ध १३ गुरुवार संध्याकाळचा च्यार घटका दिवस राहिला ते समई श्रीमंत राजश्री चिमाजी आप्पाचे पत्र मातुश्रीस आले की, शुद्ध १२ बुधवारीं प्रातःकाळचा दाहा घटका दिवस आला ते समई राजश्री
स्वामीनीं वस्त्रें दिल्हीं बितपशील:-
श्रीमंत राजश्री बाळाजी बाजी- राजश्री चिमाजी अप्पास बहु-
राऊ यांस पेशवाईची वस्त्रें दिल्हीं. मान वस्त्रें
१ चिरा बादली, १ चिरा बादली,
१ बादली जामेवार, १ बादली जामेवार,
१ बादली चादर, १ बादली चादर,
१ पटका, १ पटका,
१ तरवार, १ मोत्यांचा तुरा,
१ कटार, --------
१ मोत्यांचा तुरा, ५
१ हस्ती, माहादाजी अंबाजी पुरंदरे,
----- १ बादली चिरा,
८ १ पासोडी पैठणी,
येणेंप्रों। राजश्रीनीं वस्त्रें दिल्हीं. आपणांस कळावें ह्मणोन लिहिलें असे, असें पत्र आलें. नौबत तेच वेळेस सुरूं जाली. तोफांचे आवाज केले. जिलीबदार आला. त्यास रुपियाचे कडें व तिवट लाल दिल्हें असे. १
रोजमजकुरीं मातुश्री लाडूबाई देशमुखीण केळाहून येत होती. करंदीपाशीं गोविंदरायांनी वाट कुडली होती ती काट्या उपटून आली. वाट कुडावयास गरज नाहीं, ऐसें सांगितले. अंतबा चिंचवड़ाहून पासणियास आले होते. त्यांस वर्तमान कळलें. तेव्हां बाईकडे गेले. रंगोपंत बराबर होते. त्यांस वेडेंवांकडें बोलिले. कलह जाला. दिवाणपावेतों गेला आहे. मातुश्री लाडूबाईनी साडीचोळीस द्वाही दिल्ही कीं, इसाफतीचा गांऊ, येथें जें असेल तें दोघांचे, ऐसें असतां तुह्मी कां शेत वाहतां ? वाट तुह्मास मोडावयास काय गरज ? त्याजवरून शेतास द्वाही पडिली. दिवाणचीं माणसें जाऊन वाट पूर्ववतप्रा। केली. सखोजी काट्या, सरीक गोविंदरायाचा, यास आणावयास माणसें दिवाणची गेली. तो पळाला. चौकी घरीं बैसली होती. दुसरे रोजी येथें हजीर करूं ह्मणून करार केलियावरी चौकी उठविली. त्याजवर सातबा व गोविंदराऊ यांस बोलावून नेलें. ब्राह्मणावर हात काय समजोन टाकिले ऐसें नशहतेचें भाषण करणें तें केलें. दुसरे रोजी मोरोपंतास घेऊन येणें, जाबसाल करणें, ह्मणून आज्ञा केली. मोरोपंतीं जाऊन सालसाल काय करावें, लाडूबाईचे पासणियांत कांहीं नाहीं, ऐसे मल्हाटे बोलले. परंतु मोरोपंतीं कैसें ह्मणावें ? कतबा मागितला तरी कैसा द्यावा ? याजकरितां मोरोपंत अप्पानी बाबदेवभट धर्माधिकारी लाडूबाईकडे पाठविले. मधेस्तीस घातले, कीं, बाई ! तुझें निमें पासणें, जे आहे ते तुझे, तू लांबवू नको. ऐसें कितेक प्रकारे सांगितले. देवजी त्रिंबक मोंढवेंकर कुलकर्णी, अप्पाचे भाचे, यांसहि मधेस्तीस घातलें. शेवटीं मोरोपंत नवे रोजीं शुक्रवारीं लाडूबाईकडे गेले. दोन नमस्कार केले की, लांबवूं नको, जे पासणियांत आहे तें तुह्मां दोघाचें, साडीचोळीचा मजकूर पुसतां तरी देशमुखीकडे आहे. सहा खंडी रिठे, मळई पांच मण, चोळी व खंडी साडी ऐसें आहे, वरकड शेतें वाहत आहेत, ती त्यांस पोंहचत नाहींत, तुमचीं निमें त्याची निमें त्या गांवांत, ऐसें सांगितलें. याची वाट मी करितों, ऐसें ह्मटलें. तेसमई बाबदेवभट, देवजीपंत, यादोपंत, जगोबा, व नाना ऐसे जवळ होते. साडीचोळीसाठीं लाडूबाई बोळ घालणार मोरोपंतावर. मग काय खरे सांगतील ते पाहावें. ऐसें वर्तमान जालें असे.