सालमजकुरीं हरी मोरेश्वर राजआज्ञा वारले होते. त्याचें पद त्याचा भाऊ भवानीशंकर यांस मागेंच दिल्हें असे. १
आषाढ शुद्ध ८ मंदवारीं सालगुदस्ताचे खंडणीची वस्त्रें पाटस तर्फेच्या पाटिलास दिल्हीं. नवीं वस्त्रे जालीं.
१ रेखाजी प॥ शितोळे कुरकुंबकर यास रायांनीं पटिसीं वस्त्र घ्यावेसें केलें. त्याच्या वडिला पुतण्याचे जांवयाचा करभार व . शिरपाव ऐसें केलें, ह्मणून रखोजीच्या मुलास रायांनी मागें
वस्त्र दिल्हें.
२ दउंडचे जठार चौगुले याची मनसुबी रायांनी पाटसीं केली. मायाजी व जठार ऐसे दोन चौगुले केले. त्यांस वस्त्रें दिलीं.
३ आषाढ शुद्ध १० सोमवारीं बाजी शेट्या पुणेंकर याची बायको अक्काई वारली असे.
शुद्ध एकादशी मंगळवारीं विनाजी धर्माजी खाडे, जोशी कुलकर्णी साकुर्डे व जेजुरी वगैरे, हे आपाजी बाबाजी खाडे यासीं भांडतात की, तूं आमचा भाऊ नव्हेस, आडनांवचा खाड्या, गुमास्तगिरीस लिहिणार, तुझे वडील ठेविले ह्मणून तूं भाऊ जाला नाहीस. ऐसें भांडण जालें. अप्पाजीपंत बापूजीपंतनानापाशीं फिर्याद जाले, माघमाशीं अखेरी. त्याजवरून बापूजीपंतीं दाहा रु॥ मसाला करून विनाजी व धोंडोबा आणिले. त्यांणीं राजश्री रायाचें पत्र नानास आणिलें कीं, तुह्मी याची मनसुबी न करणें, खासा स्वारी पुणियास जालियावरी मनसुबी केली जाईल. असें पत्र आणिलें. परंतु बापूजीपंतीं तकरीरा जमानाचे तगादे लाविले. धोंडोबा भावबंदास पुसावयास जेजूरीस गेला. मागें आपाजी व विनाजी आपल्यांत आपण समजले. दोन वाटे विनाजी खात आहे, एक वाटा आपाजी खात आहे, त्याप्रों। खावें, भाडूं नव्हे, ह्मणूं नये, ऐसें बापूजीपंताचेथें एकांतीं समजलें. त्यांणींहि एकांतींच उभयतांचे दिवाणांत कुतबे घेतले. व एका बारीस समजाविशींचे कागद घेतले. दिवाणांत नजरचे कतबे घेतले; विनाजी रु॥ च्यारशें व आपाजी दोनशें, ऐसे साहाशे. याखेरीज अप्पानीं आणीख तीनशें ऐसे घेतले. शेवटीं विनाजी फिरला, ह्मणों लागला कीं, मजला अप्पाजीनें रहाविलें व दिवाणानें दबाविलें आणि कागद लेहून घेतले. ऐसें ह्मणों लागला. मग विनाजीस अटकेस बसविलें. शेवटी त्याची वडीलभाऊ महिपती आला. त्याजपासून च्यारशें रु॥ घेऊन विनाजीनें तीन कागद लेहून दिल्हे होते ते त्याचे माघारे दिल्हे. विनाजी अटकेंत होता तो अजी मोकळा केला. याउपारि मागती हरदोजणीं भांडावें, तकरीरा जमान न घ्यावे. गांऊ अमानत केलेच आहेत. याप्रा। आहेत. एसें आजि जालें असे. १