श्री.
यादी स्मरण. सुहूरसन इहिदे अर्बैन मया अलफ, सन हजार ११५०, छ ८ रा।वल, जेष्ठ शुद्ध नवमीसहदशमी, मंदवार. रोज गुदस्तीं रात्रीं अवशींच म्रुग निघाला. शके १६६२ रौद्र नाम संवछरे. अवल साल, करीने.
जेष्ठ शुद्ध ११ एकादशी सोमवासरीं संध्याकाळी आवशीचे रात्री श्रीमंत राजश्री अप्पा व राजश्री नाना पुणियास आले. दुसरे रोजीं रायांचे मासश्राद्ध. अप्पा, नाना, कुलाबियास आंगरियावर गेले होते
ते आले असेत. १
जेष्ठ शुद्ध १३ बुधवारीं श्रीमंत राजश्री नानास राजश्री रायाच्या दुखवटियाचें वस्त्र देशमुख देशपांडियांनी मिळोन खसखशी शेला दिल्हा असे.
जेष्ठ वद्य ५ मंगळवारी मातुश्री काशीबाई रायांचे लष्करसहवर्तमान दोघटका रात्रीं घरास आली. दुसरे रोजी बुधवारी अप्पा-नानानीं सातारियास जाण्यास प्रस्थान केलें. वासुदेव जोशी याचेथें जाऊन राहिले. राजश्रीकडून रावबा मंत्री व जिवबा चिटणीस यांचा धाकटा भाऊ, यांस हुजूर राजदर्शनास न्यावयास आले. त्याजबराबर जाणार आहेत. गुरुवारी स्वार होऊन गराडियावारून गेले असेत. १
आषाढ शुद्ध १ प्रतिपदेस खबर आलीं कीं, रघोजी भोंसले व फत्तेसिंगबावा यांणी अरकाटची सुभा बुडविला. शहरापासून खंडणी घेणार. शंभर हत्ती व तीन हजार घोडे पाडाव जालीं. सुभा जिवें मारला. माणूसही फार मारलें. कडपियापासून अडीच लक्ष रु॥ खंडणी घेतली होती अगोधर. मग अरकाटावर गेले. १
आषाढ शुद्ध ३ संभाजी बिन कान्होजी घुला वडील मोकदम व मोरोजी बिन कान्होजी घुला, यांची समजाविष जाली. पाटिलकी दोठांई जाली. मानपान, पुळा, हक, उत्पन्न, दोठाई निमेनिम. वडिलपण अघाड, संभाजीकडे. धाकुटपण माघाड, संताजी बिन महादोजीकडे. शिरपाव दोन, पोळ्या दोन, अवघें दोन दोन केलें असे. संभाजीस शंभर रु॥ व संताजीस साशें रु॥ हरकी पडली. राजश्री बापूजीपंत याखेरीज चार वसरी यांचे आहेत. दोघांस दोन वस्त्रें शुद्ध ५ मंगळवारीं बांधून गांवास जावयास निरोप दिल्हा असे. १