कार्तिक वद्य २ मंगळवारी राजश्री राऊ दिव्याकडून जेजुरीस, कुरकुंबेस गेले. कृष्णाजीपंत कामथे चांबळीकर येथें येऊन महिना दीडमहिना बैसले होते. पेशवियांस कांहीं एकांती पैका देऊं केला असेंही ऐकतों, आणि कागदही घेणार असें वर्तमान आहे. परंतु आजी निरोप घेऊन आपल्या गांवास गेले असेत. पाटस कानगांवे येथील शिंवेचा कजिया विल्हेस लावावयास गुणाजी कृष्ण पेशवियांनी पाठविले होते. दाखले, मुकाबले, भोगवटे, वरवंडकर यांची गोही जशी कानगांवकर ह्मणतात ते खरें जालें. परंतु पाटसकर ऐकत नाहींत. येथें येऊन दिव्य करितों आपण, ऐसें कतबें दिल्हे. तूर्त दिव्य घ्यावें तरी अस्त आहे. माघमासीं घ्यावें ऐसें नेमउत्तरें लेहून घेऊन उभयतांस निरोप दिल्हा असे. खंडो आपाजी तट्टू यांणीं पाटसकरांकडून धटाई करवली आहे. परंतु वहितजमीन कानगांवकरांची तीन चार वरसें पाडिली आहे. पाटसकरांचे कानगांवकरांचे कागद,
२ पहिल्या तकरीरा शिंवेची निशाणें लेहून दिल्ही असेत.
२ जमीनत कानगांवकरांस पेरावयास राव सांगत होते ते तूर्त तकूब राखावी, मनसुबीमुळें जमीन त्याची होईल त्याजकडे लागेल, हा डाग ज्याजकडे लागेल त्यानें जाब करावा.
२ दिव्ये पाटसकर पाटलांनीं करावें. ये गोष्टीचे कतबे.
२ दिव्यास माघमासीं हजीर व्हावें. अशीं नेम उत्तरें गोपाळरायापाशीं असेत.
-----
८
यणेप्रमाणें कागद घेतले असेत. १
कार्तिक वद्य ४ गुरुवारीं अवशीचे रात्री चिमाजी अप्पा मुहूर्ते पलीकडे डेरियांत जाऊन राहिले असेत.
कार्तिक वद्य १४ रविवारीं कल्याणराऊ मिरजेहून गांवास आले. जेजुरीकर गुरव यानें मल्हारी मार्तंडाच्या जामदारखान्यांतल्या वस्तभावासाठीं भांडत होते. एकजण गुरव (कोरी जागा) याचपाशीं वस्ता होत्या त्या त्याणेंचखादल्या. त्यासी वरकड भांडत होते. तो ह्मणे, मजकडे वस्ता राहिल्या नाहींत. वरकड ह्मणत आहेत. जेजूरीस विठ्ठलरायापाशीं कजिया पडिला, देशमुख देशपांडे जाऊन इनसाफ केला, याजकडे वस्ता होत्या त्याजकडे आहेतसें जालें, मग हुजूर जाऊन एकजण आपल्याकडे वस्ता नाहींत ह्मणत होता तो खोटा जाला होता, त्याप्रमाणें जाला. त्याजला देवाच्या वस्ताचे दीडहजार रुपये व गुन्हेगारीचे दोहजार रुपये खंडले. वरकडांस हरकीचे हजार रुपये खंडले. यणेंप्रमाणे जालें असे. जेजुरीकर पाटील कुलकर्णी खोटियाची पाठ राखत होते. परंतु परिणाम जाला नाहीं. ऐसें जालें असे.
कार्तिक वद्य ३० अमावास्या सोमवारी दोन घटका दिवस उरला ते समईं कल्याणराऊ निलकंठ याची स्त्री सौ। काशीबाई जुन्या घरांत प्रसूत जाली. पुत्र जाला असे.
मार्गेस्वर शुद्ध १ प्रतिपदेस मंगळवारीची तीन प्रहर रात्र जाली, ते समईं बाजी हरी सुभेदार सुपेकर याची बायको, अंतोबा नाईक भिडे याची कन्या, वारली असे. पुणियांत गोपाळराम देशपांडे याचेथें.