कार्तिक शुद्ध ८ अष्टमी रविवारी रामभट धर्माधिकारी श्रीकाशीस वास करावयास गेले. त्याची विहिण टुल्लीण इचें घर मल्हारभट ढेंकणें याजपाशीं कर्जांत लेहिलें गुंतलें होतें. त्याचे शंभर रुपये रामभटजी ढेंकणियास देऊन घर सोडवून टुल्लिणीसहि महायात्रेस नेलें असे. आपला नातू नरसिंह हा विद्याआभ्यासास बरोबर घेऊन गेले असेत. राघोराम देशपांडेहि माहायात्रेस गेले. १ राणोजी शिंदे कार्तिक शुद्ध दशमी मंगळवारी औंधास गेले. वरकड सरदार आपलाले ठिकाणास गेले. रामचंद्रजी पाटसास गेले. राणबांनीं कार्तिक शुद्ध १२ गुरुवारी पासणाच्या जमिनींत वोहळियापाशीं आउतें पेशवियाचे हिमायतीनें धरलींत आणि दुसरे रोजी शुक्रवारी पाटसास गेले. आउतास अडथळा पासणेकरांनी करावा, तरी पेशवे येथें रागास येणार ! याकरितां, तृर्त काळावर नजर देऊन बैसले असेत. गांऊ तो वोस पडिलें आहे !
कार्तिक शुद्ध १२ गुरुवार संध्याकाळीं राजश्री पंतप्रधान नदीपलीकडे जाऊन भांबोडियाच्या रानांत कोथळियाचे उत्तरेस डेरियांत जाऊन राहिले असेत. मुहूर्ते गेले असेत. वद्य २ मंगळवारी राऊ जेजूरीकडे गेले.
कार्तिक शुद्ध १५ रविवारी संध्याकाळीं राजश्री बाळाजीपंत नाना मिरजेहून राजश्रीपासून पुणियास आले. माहादोबा सासवडास आले.
एका दो रोजा येणार. सटवाजी संभाजी जगदळे गाऊकर याजलाही राजश्रीपासून घेऊन आले. तूर्त कीं, यांची त्यांची समजाविष करूं.
राजश्री मोरो मल्हार मेंडजोगी यांणी दत्तपुत्र खंडोबा घेतला असे. त्याजला पत्र लेहून दिल्हें कीं, तुह्मास आपण दत्तविधान करून घेतलें आहे. त्याजवर आणीख पुत्र आपणास जाले, आपली वृत्ति जे आहे ते ते तुह्मीं यथाविभागें खाणे. त्याजवरी जगोबाची साक्ष लेहून घेतली आहे.