भाद्रपदी यात्रेस श्रीदेव पुणियावरून मोरगांवास गेले नाहींत. मळीकडवणे याजवरून गेले आले असेत. १
भाद्रपद शुद्ध ४ रविवारी राजश्री कृष्णाजी दाभाडे तळेगांव तारले असेत. १
भाद्रपद शुद्ध १२ सोमवारीं राजश्री चिमाजीअप्पा वसईप्रांत फत्ते करून चिंचवडावरून पुणियास आले. राजश्री राऊ औंधापावेतों सामोरे गेले होते.
संभाजी पाटील शिरवळे यासी मोहपजी पा। शिरवळे वडीलधाकुटपणाचें भांडण भांडतो. त्यांणी राजश्री छत्रपतीचे व पेशव्याचे कागद बापूजीपंतास आणून गोत आठ गांऊ व कांहीं शिरवळदेवाचें गांउ नेमून घेतले. संभाजी वडील होता. परंतु मोहपजीनें हीमायतीनें आपले सोईचें गोत नेमून घेतलें असे. संभाजीचें घर वडील. दुसरा तिसरा मोहपजी, असें असतां, मोहपजी, कांहीं खर्चवेंच आपणांस पडिला असे, कसाला असाला पडिला, याजकरितां संभाजीच्या वडिलीं आपणास वडीलपण दिल्हें आहे, असें भांडतो. १
सुभानजी कदसुळा लोणकर यासी कुंबरपाटी सा रुके, पैकीं ती रुका सुभानजी, ती रुका कृष्णाजी कदमुळा ऐसे वाटतात. त्यास कृष्णाजी ह्मणतो सजणीही आपली ह्मणून सुभानजीशीं भांडतो. तकरीरा, राजीनामे, जामिन कतबे दिवाण घेतले. पांढर आणिली. मग गांवकरियांनी निकाल काहाडिला कीं, आह्मीं यास घेऊन गांवांस जातों, पांढरींत शोध करून विल्हेस जाऊन येऊन सांगों. ऐसें ह्मणून निरोप घेऊन गांवांस गेले. कृष्णाजी कदसुळास तान्हाजीपंत हवलदार याची हिमायत फारशी असे. १
राजश्री चिमाजी अप्पा. वसईहून भाद्रपद शुद्ध १२ सोमवारीं पुणियास आले. त्यास भेटीस सामोरे आउंधापाशीं देशमूख देशपांडिये गेले. समाईक वस्त्र उभयतां देशमूख व देशपांडे मिळोन नेले. गु॥ रामाजी मा। परांडकर पागोटें किंमत रुपये ६, सन ११४९.
भाद्रपद वद्य सप्तमीचा पक्ष पेशवियाचेथील जाला. सकट अर्धा रुपया आगांतुकास दक्षणा दिल्ही असे.
अष्टमीस राणोजी शिंदे व रामचंद्रबाबा आले. द्वादशीस राणबी आवंधास पित्रें घालावयास गेले होते. त्यांची रोख चिमाई, तेथें त्रयोदशीस कोनी निघाली. लेक जाली असे. १