रोज़ मजकुरीं देशमुखें कराडियांच्या गोसावियाकडे गेली असेत. १
श्रावण शुद्ध ६ रविवार नागपंचमीस राजश्री राऊ घटिका रात्री पुणियास आले असेत. १
षष्ठी सप्तमी दोन रोज ब्राह्मणभोजन घातलें, अष्टमीस देकार दिल्हा. अर्धा, रुपया, दोन रु॥, याजवरतें अगत्यास, याप्रमाणे दिल्हा असे. १
श्रावण शुद्ध षष्ठी सोमवारीं घटिका रात्रीस राघो गोविंद याची बायको, मांजरीकर कुलकर्णी यांची लेक जानकी, वारली असे. १
श्रावण शुद्ध नवमी गुरुवारी अपूर्व आढळलें ! पाथरवटाचा लेक विसा पंचविसा वरसांचा होता तो वारला, आणि आपल्या मायबापाच्या सपनास आला कीं, मी मागती तुमचे पोटी जन्म घेतों, अमके दिवशीं उपजेन, त्याजवर पांच महिने जालियावरी मजला राजश्री बाजीराऊ प्रधान यांच्या पायावर नेऊन घाला, ह्मणजे मी वाचेन, नाहीं तरी मरेन, त्याजवरून सदरहूप्रमाणें प्रचीद पाथरवटास आली. त्याणें मूल रायाच्या पायांवर आह्मादेखतां आणून घातलें असे ! १
अचलोजी पाटील कुंभारकर मौजे वणपुरी यांसी जैतजी कुंभारकर निमे पाटीलकीसी भांडतो. याकरितां उभयतांस राजश्री बापूजीपंतीं गोत सासवड़, कर्यात, व कर्हेपठार येथील गांऊ नेमून दिल्हे असेत.
पुणेकर कुंभार यांचा कजिया राजश्री केसोपंत मोकाशी याजपाशीं पडिला होता. राजश्री राऊ आलियावरी सुर्या कुंभार हुजूर जाऊन फिर्याद ज़ाला, मजवर जुलूम होतो, सायबी रुबरु मनसुबी करावी. त्याजवरून रायानीं अंताजीपंत फडणीस याजला मनास आणावयास सांगितलें असे.
गोरोजी गुरव चिंचवड़कर बावा याचा पुतण्या चिमा व त्याची बायको ऐसीं राजश्री स्वामीपाशीं मिरजेचे मुक्कामी फिर्यादीस गेलीं कीं, विठू व हर गुरव माळशिरसकर हे आपले गांवीं राहून उत्पन्न खातात. त्यावरून राजश्री स्वामीनीं बाळाजी बाजीराऊ यांजला सांगितले. त्याणीं
विठू गुरवास दाहा रुपये मसाला करून जासूद पाठविले. त्याजबरोबर गोरा गुरवही चिंचवाडास गेला. श्रीनीं रागें रागें गोरियास मारिलें, जामुदास मसाला न देतां जा ह्मटलें. ते जासूद रायापाशीं आले. रायानीं गिरमाजीपंत श्रीचे कारकून जासूदाबरोबर आले होते, त्यांजला सांगोन विठूस आणविले. त्याजला पुसिलें कीं, तू याचें काय खातोस ? त्याने सांगितलें कीं, आपण याचें कांहीं खात नाहीं. देवाची चाकरी करून आहे. त्यावरून दोघांही गुरवाचे कतबे घेतले, विठूपासून दाहा रुपये मसाला घेतला तो विठूनें दिल्हा. विठूस निरोप दिल्हा. गोरोजीस सवादोनशें रु॥ हरक़ी पडली. त्याजला पेशवियांनी पत्र करून दिल्हें कीं, तुझें गांवगतीचें काम तुझें तूं कर, श्रीनीं नवीन देवळें बांधलीं आहेत तेथील पूजा श्रीचे श्री घेतात, त्या देवाच्या शेवेस श्री ब्राह्मण ठेवतील, गुरवच ठेवणें जालें तरी तुह्मांस ठेवतील, माळशिरकरांस ठेवावयास गरज नाहीं. ऐसें पत्र दिल्हें असे,
श्रावण वद्य १३। १४ भाद्रपद शुद्ध १।२ ये संधींत श्रीची यात्रेची जावयाची घालमेली, तेसमयीं सदरहूप्रा। जालें असे. श्रीच्या चित्तास येत नाहीं.