जेष्ठ वद्य १२ गुरुवार पुणाची पांढर व सागांवचे थळें कुंभारपिराच्या दरगियांत कुंभाराच्या साक्षी : पुणेकर कुंभार ह्माळोजी व बरवाजी एकघरें मायाजी कुंभाराशीं भांडतात कीं, तूं आमचा नव्हेस, अकुर्डीचा. याजबद्दल साक्ष पुसीली. तेथें साक्षीदारांनी सांगितलें की, मायाजीचे वडील येथें बहुत दिवस आहेत, ते दोघे, हा तिसरा, ऐसे ती टाईं कसाला करून खात आले आहेत, कोण्ही कोण्हाचा सरीक ऐसे ऐकिलें नाहीं, मायाजीचें गांव आकुर्डी चोंवाडियाचें आहे, यामुळें आकुर्डे ऐसें ह्माळोजीच्या बरवाजीच्या तोंडें ऐकतों. कोण्ही गोही दिल्ही कीं, ह्माळोजी बरवाजी हे ठावके आपणास आहेत, त्यांच्या तकरीर केशो संबदेऊ मोकाशी याजपाशीं आहेत, त्यांच्या नकला देशपांडियापाशीं आहेत, कुंभार एक नदीजवळ नाहींत. दशरथ पंचरथ साक्षीदारांस नेमिले असेत.
आषाढ सुध ४ शुक्रवारीं देवजी दांगट वडगांव नेहरज येथील दिव्यामुळें नवा पाटील जाला होता तो वारला असे.
आषाढ सुध १ सोमवार छ २९ रावल रा। नारो अनंत अजहत देशमुख व राघोराम देशपांडे हिंगण्यास मंगळवार बुधवारीं गेले. माहरांची हडकी गांवाखालीं पडली होती ते त्यांची खरी करून त्यांच्या हवाली केली. चावर अनमाने बिधे.
मायाजी पा। बर्हाटा याचा व तुकोजी बर्हाटा याचा घराच्या जागियाचा शेजाराचा काजिया होता तो विल्हेस लाविला असे.
आषाढ शुध ४ शुक्रवार वितिपात होता. ते दिवशीं आउंधकरांनी गतवरसीं नांगरत होते त्यांत ओहळ्याखालें कुळव धरिले होते. दुसरे दिवशीं पासणेकर कल्याण निळकंठ जाऊन द्वाही दिल्ही. आऊतें सोडविलीं. आऊतें धरिलीं त्याचे आधले दिवशीं आउंधकरांनीं आऊतें धरावयाचा विचार केला होता. आऊतें न्यावीं तो त्याच रानांत शिंगरूं लांडग्यांनी मारिलें. आधले दिवशीं आऊतें धरणार होते. ते दिवशीं शिंदियाच्या ह्मशी भांडल्या, पडोन मेल्या, दोन. बैलही एक मेला. पाऊस लागला. त्यामुळें दोन दिवस गुंता जाला. तिसरे रोजीं वितिपातावर आऊतें धरिलीं. आउंधकर हिमायेतीने आऊतें धरितात. परंतु ईश्वर त्यास नतिजा देतो. परंतु भाग्यामुळे चित्तांत आणीत नाहींत.
आषाढ सुध ७ सप्तमीसह अष्टमी सोमवारी अवसीच्या पहिल्या प्रहर रात्री जालियावर नवे घटकेस राणूबाई आंगरीं, देशमुखाची कन्या, वारिली. संगमीं दहन केलें.
लक्ष्मण शेलार देलवडकर याजकडून पाणी पाजविलें. मधर्याची व ज्वराची वेथा जाली. खंग लागली. चैत्र वद्य ३०, कुलाबियांत वेथा जाली होती. मूळ पाठवून आणिली.