जेष्ठ शु॥ ७ शनिवार महादाजी दादो व खंडो त्रिंबक टुलु याणीं राजश्री बापूजीपंताचे दरबारी कानडियास येजितखत खडकीच्या कुळकर्णाचें लेहून दिल्हें असे. दोघांनी अर्धे अर्धे लेहून दिल्हें असे. पांढरीनेंही साक्ष पहिले नागेशाचे देवळीं व कचेरीस सांगितलें की, मूळ वृत्ति जोशी कुळकर्णी कानड्यांची, कानड्यांनीं टुल्लु गुमास्ता ठेविला होता, तो बळकावून आपलेंच कुळकर्ण ह्मणून खाऊं लागला, परंतु जोतीश कुळकर्ण कानड्याचें खरें. त्याजवरून येजितखत दिल्हें असे.
कानडियास वर्तणुकेस व टुल्लूस जामीन वर्तणुकेस व
उगवणीस जमान गोपाळ उगवणीस जगन्नाथ खंडेराऊ
मोरदेऊ माळी हरकी रु॥ ३५०; खांबणेरकर, गुन्हेगारी रु॥ १००;
येणेंप्रमाणें केलें असे. कानडियास खरेपणपत्रें करून दिल्हीं असेत. वस्त्र आषाढ सुध ७ रविवारीं खरेपणाचें दिल्हे, व पत्रेंही करून दिल्हीं असेत. येजितखताचे वेळेस महादेव टुल्लु कांहीं लेहून दिल्हें, मधें रडों लागला, लिहिनासा झाला, त्याजवरून दटाविला, असें असे. टुल्लूनें लिहून दिल्हें कीं, पहिले बंडा कुळकर्णी होता, त्यानें कुळकर्ण आपल्या वडिलास दिल्हें, व जोतीष कानड्यास दिल्हें, ते गोष्ट त्यांच्यानें खरी करून देविली नाहीं, त्यामुळें व पांढरीच्या साक्षीनें लटका जाला असे. माचीस गोह्या दिल्या कीं, जोसपण कानडे खातात व कुळकर्ण टुल्लू खातात, ऐसें कां लेहून दिल्हें ह्मणून पुसिलें. त्यास पाटील बोलले की, आमच्या वतनाचा महजर टुल्लूपाशीं होता, तो हातास आला पाहिजे ह्मणून त्याजसारिखें बोलिलों, चाल सांगितली. ऐसें जालें असे. १
टुल्लू कुळकर्ण करीत होता त्यास द्वाही कानड्यानें दिल्ही. त्यामुळें कुलकर्ण अमानत होतें. त्यास, अमानताबा। गांवकरियांपासून कुळकर्णियाच्या हक्काबाबत दाहा बरसांचे रुपये ३०० तीनशें राजश्री बापूजीपंतीं घेतले असेत.
जेष्ठ शुद्ध ८ सोमवार खंडो विसाजी देशपांडे यांचा लेक धाकटा महादेव यांचे लग्न तळेगाऊइंदुरींत जालें. जिवाजी गेविंद याची नात, बाळकृष्णाची लेक, केली असे.