श्री.
यादी, करीना, स्मरणार्थ, शके १६६१ सिद्धार्थिनाम संवछरे, वैशाख वद्य १४, शुक्रवार, म्रुग निघाला, नवे साल, सुहूरसन अर्बैन मया अलफ, सन हजार ११४९, छ २७, सफर.
जेष्ठमास बोलबोजी बरेकर, अंबोडीचा पा।, नानापासीं पाटिलकीच्या कज़ियानिमित्य उभा राहिला. त्याजवरून जाकोजी बरेकरास तलब करून आणिलें. जामीन तकरीरा घेतल्या, तों राजश्री बाळाजी बाजीराऊ यांचे पत्र मिरजेकडून आलें कीं, तूर्त लावणीचे दिवस आहेत, त्यास निरोप देणें, पेस्तर राजश्री अप्पा आलियावर मनास आणणें तें मनास आणतील. त्याजवरून निरोप नानानीं दिल्हा असे. १
श्रीचिंतामणी थेऊर याची खोळ अवघी सुटली.
बहिरजी बरेकर, चौगला, मौजे पिंपळे, ता। कर्हेपठार, यासि मल्हारजी बरेकर चौगुलकीबद्दल भांडतो. बहिरजीनें आपलें घर शेकारिलें. त्यास, मल्हारजीनें द्वाही दिल्ही. नानापासीं भांडत आले, नानानीं मनास आणावें. जामिन घेतले. तकरिराही घेतल्याच होत्या. त्याजवर राजश्री बाळाजी बाजीराऊ यांचें पत्र आलें कीं, त्यास येथेंच पाठवून देणें. त्याजवरून पाठवून दिल्हे असेत.