शके १६६० अधिक आश्विन मास.
अधिक वद्य १ निळो विठ्ठल देशपांडे याणीं ब्राह्मणभोजन केलें. नडगेमोडीस वोंकाराच्या देवळापाशीं आगांतुकाचा स्वयंपाक केला. ग्रामस्थांचा घरीं केला. ग्रहस्थही भोजनास अवघे गेले. चवलाप्रों। दक्षणा दिल्ही. बाबूजीनाईक जोशी याणीं निळोबाचे साहित्य ब्राह्मणभोजनाविशीं केलें असे. वरकडही केलें असे. निळोबास पैका भाऊबंद देईनात. त्यानेंच अवघें मान्य केलें आणि देशमुखाकडे आले. उभयतां देशमुखांनीं रामाजी मल्हार यांजपासून हजार रुपये दुहोत्राच्या व्याजें जातखत देऊन काढून दिल्हे. निळोपंत व बाजी मोरेश्वर याणीं आपलें जातखत देशमुखास दिल्हें असे.
अधिक वद्य ७ स राजश्री चिमाजीअप्पा नांदेडियास दत्ताजी जाधव याचा बाग पाहावयास गेले. पालखीच्या दांडियाचें कलबूत कळंकीस घालीत असतात तेंहि पाहावयास गेले असेत. रोज मजकुरीं राणोजी शिंदियानीं पासणाच्या शिवारांत जबरदस्तीने नांगर घातले ह्मणून बजाजी कोकाटे व सूर्याजी ठाणगा व धरा महार सांगावयास आले असेत.
अश्विन वद्य.
सिंहगडाहून राजश्री पंतसचींव यांच्या मुतालकीच्या शिकियानें, वकिलीच्या शिकियानें, ऐसे दोठा रोखे कैलियास चालले आहेत कीं, मौजे मजकूरचें कुलकर्ण कोण्हाचें असे, ते हकीकत करणें. आहे तोंपर्यंत कुळकर्ण अमानत केलें असे. दिवाणांतून कुलकर्णाचें लिहिणें लिहावयास ( पुढे कोरें.)
अधिक आश्विन वद्य ३० सोमवार.- निळो विठ्ठल देशपांडे याची मातुश्री मथुराबाई यांस देवआज्ञा जाली. रात्री पहिले प्रहरीं जाली.
आंश्विन शुद्ध १० बुधवारीं दसरा.- रा॥ तुळाजी बिन संभाजी शितोळे न्हावकर यासी सरनोबती दिल्ही. - पालखी दिल्ही असे. कसबे सुपें सुभेदार बाजी हरी यांजकडून काढून आवजी कवडे यास दिल्हें असे. *