श्री.
यादी करीना स्मरणार्थ. शके १६६० कालयुक्तनाम संवछरे, जेष्ठ वद्य २, मृग निघाला. नवें साल. सन्न ११४८ छ० १५ माहे सफर, सुहुर सन तिसा सलासीन मया अलफ, सन हजार ११४८ आटेतालीस.
जेष्ठमासीं वद्यपक्षीं हवेली, सांडस, कर्हेपटार, नीरथडी या तरफांच्या खंडणिया केल्या. पाटिलास शिरपाव राजश्री बाळाजी बाजीराऊ यांनी हुजूर दिल्हे असेत.
१. फुरसंगीचें पागोटें पाटिलकीचें वाल्होजी कामथा याणें घेतलें होतें, तें माघारें घेतलें. फुरसंगीचे वस्त्र अमानत जालें. राजश्री स्वामीनीं होळीची पोळी अमानत केली. त्याजवरून तश्रीफहि अमानत केली असे.
१. हिवरें कर्हेपटार येथील माळी तश्रीफ घेत होते. हिवरेकर गायकवाड वगैरे हजीर होते ते गांवांस येऊन, माळियाच्या होळीस द्वाही देऊन, होळी लावूं दिल्हीं नाहीं. तश्रफेसही द्वाही दिल्ही. यामुळें अमानत तश्रीफ केली. माळियास दिल्ही नाहीं. गायकवाड तो घेतच नाहीं.
१. लोहगांवचे वस्त्र गुमास्ता ह्मणून दिल्हें. एरव्ही पाटिलास न द्यावेसें केलें असे. जानोजी भिमराव याजला वस्त्र गु।। दिल्हें असे.
१. खडकीच्या कुलकर्णासी कानडे व टुल्लु भांडतात. त्याचे अमानत / केलें असे.
जेष्ठ वद्य ५, मल्हारी नाहवी मगर यासी देवआज्ञा जाली असे. त्याचा दिवस आषाढ शुद्ध प्रतिपदेस अकरावा दिवस जाला असे.
आषाढ सुध २ बुधवारीं राजश्री चिमाजीपंतअप्पा साष्टीहून पुणियास आले. काल अवंधांत होते. आजि येथें आले असेत. १.
आषाढ वद्य ६ सोमवारीं यादवशेटीस देवाआज्ञा जाली असे. १
दादाजी रघुनाथ खळदकर याच्या बापाचें कर्ज भगवंत उद्धवमल किकवीकर याच्या बापाकडे पंधराशें रुपये पंचोत्र्याच्या व्याजाचे होते. किकवी मजरे वायदेरोखियांत गहाण लेहून दिल्हीं होतीं. त्यास, फुरसंगीच्या पाटिलाच्या कजियाबद्दल सातारियास गेले होते. तेथें दाजीपंतास वर्तमान सांगितलें. त्याजवरून भगवंतास बोलावून सांगितले की, याचें लिगाड वार. त्याजपाशीं तो ऐवज नव्हता. दाजीपंतास संतानाकरितां दुसरें लग्न करणें होतें. त्यास खर्चवेंच पाहिजे. याजकारितां त्याणीं निकड लाविली होती. मग दाजीपंतानी निकाल काढिला की, भगवंताची बहीण वधू असे, ही याणें आपणास द्यावी, व नगावजास पांच सातशें रु।। द्यावे. तेव्हां आह्मीं सांगितलें कीं, शेरभर सोनें याणें बहिणीवर घालून द्यावी. त्याजवर भगवंतानें व त्याचे आईनें व त्याचा मामा मोरोपंत करजवडकर याणें कबूल केलें. किकवीस दादाजीपंतास बोलाविलें. तेथें सातारा ग्रा। करार ह्मणून सोयरिक दिल्ही. दाजीपंतापासून फारखती लेहून घेतली. परंतु सोनें मुलीवर घातलें नाहीं. भगवंतानें फारखती दाजी ( पुढें गहाळ. )