[१८१]                                                                               श्री.                                                                  २४ सप्टेंबर १७९५.                                 
विनंति विज्ञापना. ऐवजाचे किस्तीविषयीं पेशजी खरिता दिल्हा. व हल्लीं मझरुलमहाम याणीं हजरतीस लिहिलें आहे. माझेही पत्रांत कीं, येविशीं तुह्मीं विचारून करारबमोजिब किस्त आदा होण्याचें अमलांत येई तें घडावें. त्यास मझेल्याची तकरीब लावणें निसबत नाहीं; इत्यादिक प्रकारें नबाबाशीं बोलण्यांत आलें. उत्तर झालें कीं, किस्तीस हे तकरीब नाहीं, हे वालाई लेकिन हा मझेला हायेल आहे, इनषा अल्लाहू ताला, थोडेच दिवसांत खलषरफाही होईल, जबाब ठरावून तयार करून देऊं, व तुह्मांशीं बोलण्यांत येईल. त्या तरकिबीजें लिहावें. ऐसें बोलले. तात्पर्य, ऐवजाचे किस्तीचा फडच्या तुर्त करण्याचें ध्यान दिसत नाहीं. टाळाटाळ करून दिवसगतीवर टाकावें हा प्रकार आहे. जबाब देते समयीं काय सांगतात त्याची विनंति मागाहून लिहिण्यांत येईल. किस्तीशिवाय वरकड कामें व जाबसाल तुह्मीं व मीर अलम, राजाजी ऐसें बसोन उलगडावीं ऐसें बोलण्यांत होतें, त्यांतून अद्याप एकही नाहीं, याचें काय लिहावें ? उत्तर जालें कीं, मीरअलम् यांची तबीयत दुरुस्त नव्हती, तुमचेही तबीयतीस दोन तीन दिवस बेआरामी, राजाजी व रघोत्तमराव यांचेही मिजाज मांदगी करितां राहिलें. हें बोलण्यांत आलें. आणखीही विचाराचे मार्गानें चार गोष्टी समजावून सांगून काय ठरतें त्याप्रमाणें मागाहून लिहून पाठवितों. र।। छ १० रा।।वल. हे विज्ञापना.