Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)

ताराबाईचा वसवसा याजमुळें महाराजांस पंगतीस घेऊन भोजन करावयाचा मराठे अनमान करूं लागले. त्यास परसोजी भोंसले म्हणों लागलें कीं हे संभाजी महाराजांचे पुत्र, आह्मी व ते एक जागा भोजन करतों. तेव्हां परसोजी भोसले व धनाजी जाधवराव वगैरे मराठे मिळोन महाराज एक पंगतीस भोजन केलें. तेव्हां परसोजी भोसले यांजवर कृपा करून सेनासाहेबसुभा हें पद नूतन उपस्थित करून वस्त्रें बहुमानसांप्रदाययुक्त देऊन पद दिल्हें. ते समयीं सिदोजी गुजर याजवळ सुवर्णदुर्गास कान्होजी आंगरे चाकर होते. सिदोजी गुजर राजाराम साहेबाबरोबर चंदीस गेले. तेव्हां कान्होजी आंगरे यांणीं मर्दुमकीनें सुवर्णदुर्ग बळावून तेथून विजयदुर्ग वगैरे किल्ले घेतले. ते समयीं राजारामसाहेबीं सरखिलींचें पद दिलें. त्याजउपरी तेथून येऊन कुलाबा, खांदेरी, सागरगड घेतले. ताराबाईचा व शाहू महाराज यांचा पेंच होता. याजमुळें कान्होजी आंगरे यांणीं महाराज शाहूराजे यांच्या राज्यांतील किल्ले लोहगड व राजमाची, तुंग, तिकोना, धनगड हे किल्ले घेतले. व लोहगडाहून बहिरोपंत पिंगळे यांस आंगरे यांणीं धरून नेले. याउपरी कान्होजी आंगरे सातारियापावेतों येतो; महाराजांजवळ द्रव्याचें बळ नाहीं; कान्होजी आंगरे यांणीं दर्यांत पुंडावा करून खजाना मेळविला व जातीनें मर्द, तेव्हां महाराजांस विचार पडला कीं बहिरोपंतास धरून नेलें; राज्याचा बंदोबस्त झाला पाहिजे; पिंगळे नाकर्ते. ते समयीं परशरामपंतास पेशवाई तुह्मीं करून राज्याचा बंदोबस्त करणें; आंगरे यांणीं घेतले त्याचें पारिपत्य करून किल्ले घेणें, म्हणून आज्ञा केली. त्यास, परशरामपंत यांणीं विचार केली कीं बाळाजी विश्वनाथ यांजकडे फौजेचें वळण आहे; त्यांस पेशवाईची वस्त्रें द्यावी; ते बंदोबस्त करतील. तेव्हां खंडो बल्लाळ चिटणीस यांसही महाराजांनीं विचार पुसून बाळाजीपंतनानास आज्ञा केली, त्यांहीं मान्य केलें. ते समयीं वस्त्रें व शिक्केकटार प्रधानपंताची देऊन रवाना केलें. त्यांहीं तीन चार हजार फौज जमा करून दरमजल लोहगडाखाली गेले. नानांचा व आंगरे यांचा कागदींपत्रीं घरोबा होता. आंगरे यांस पत्र लिहून पाठविलें व दरमजल कुलबियास गेले. सरखेल पुढें सामोरे येऊन भेटीचा समारंभ झाला. उपरांत, खलबतास बसोन त्यांस सांगितलें कीं तुमचा व आमचा भाऊपणा. पेशवाई तुमच्या घरांत. आयते किल्ले देत असाल तरी तसेच सांगावें. शिक्केकटार व वस्त्रें त्यांस दाखविलीं व त्यांस विचार सांगितला कीं सरखेलींचें पद ताराबाईकडून आहेच; इकडूनही करार करून देवितों. महाराजांचे चाकर होऊन कृपा संपादून घ्यावी. त्याजवरून त्यांनी मान्य करून राजमाची मात्र ठेवून लोहगड व घनगड, तुंग, तिकोना, या किल्ल्यांच्या चिठ्ठया देऊन किल्ले देविले. जंजीरकर हबशाचा व आंगरे यांचा कलह लागला होता तो तह करून दिला. बहिरोपंत पिंगळे यांस धरून नेलें होतें त्यांस सोडून समागमें घेऊन आले. महाराजांचे लोक किल्ल्यावर चढविले. नाना सातारियास गेल्यावर महाराजांचें दर्शन जालें. कानोजी आंगरे यांस सरखेलींचे पद करार करून वस्त्रें व शिक्केकटार पाठविली. त्यास, दमाजी थोरात हिंगणगांवकर पुंडावे करून होता. त्यास, शंकराजी मल्हार, सैद सुभेदार दक्षणचे याचे दिवाण, त्याजकडून फौज नानांनीं आणवून दमाजी थोरात याचें पारिपत्य करून त्याचा सरंजाम होता तो हुजरातीकडे ठेविला. नारो शंकर सचीव यांस थोरातांनीं धरून नेलें होतें त्यांस सोडून आणिलें. ते समयीं नारो शंकर यांची मातुश्री येसूबाईंनीं किल्ला पुरंदर व पुणें सुभा व जुन्नर स्वराज्याचा अंमल सचीवाकडे होता तो नानाकडे दिल्हा. त्या काळीं दक्षणेस पातशाहाकडून सैद सुभेदार सा सुभ्यांचे होते. त्यांचे व फरोखशहा पातशहाचें चित्त शुध्द नव्हतें. याजकरितां पातशहावर स्वारीस सैद जाऊं लागले. ते समयीं शाहूमहाराजांजवळ कुमकेस फौज मागितली. दररोज पन्नास हजार रुपये द्यावयाचा करार केला. तेव्हां महाराजांनीं नानांस जाण्याची आज्ञा केली. फौज व सरदार बराबर दिले. फौजसहवर्तमान सैदाजबळ गेले. सैद व नाना मजलदरमजल दिल्लीस जाऊन पातशहास धरून त्याचे नेत्रास अपाय केला आणि त्याचे पुत्रास तक्तावर बसविलें. ते समयीं पुणें सुभा व जुन्नरसुभा येथील मोगलाई अंमल, दरोबस्त तमाम मोगलाई राज्याची चौथाई, स्वराज्य व सरदेशमुखीचे वतन महाराजांस करार करून पातशाही सनदा घेऊन आले. सैदाकडून पन्नास हजार रुपये दररोज पावत होते. त्याजपैकीं निमें फौजेस खर्च करून बाकी खजाना बाळगून सातारियास महाराजांचे दर्शनास गेले.