६. रघुनाथ बाजीराव.
(अ) यांचा जन्म शके १६५६ आनंदनाम संवत्सरे श्रावण शु॥ १३ स झाला. (१ आगष्ट १७३४).
(ब) यांची दोन लग्नें झालीं. पहिली बायको जानकीबाई, गोपाळराव बर्वे यांची कन्या. ही सीत खमसैनात छ १३ जिलकाद, श्रावण व॥ १ (२२ आगष्ट १७५५) रोजी बाळंत होऊन वारली. पुत्र झाला होता तोही लवकरच वारला असावा.
(क) दुसरे लग्न मार्गशीर्ष शु॥ १४ छ १३ रबिलावल सीत खमसैनांत गलगले मु॥ झालें. राघो महादेव ओक यांची कन्या; नांव आनंदीबाई (१७ डिसेंबर १७५६). रघुनाथ बाजीरावाची संतती दुसरे बायकोचे पोटीं झाली ती येणेंप्रमाणें
(१) मुलगी सीत सितैनांत जमादिलाखर महिन्यांत झाली. नांव गोदूबाई. पांडुरंग बाबूराव बारामतीकर यांस दिली. लग्न छ १४ जिलकाद सल्लास सबैन, शके १६९४ साली झाले. (७ जानेवारी १७७३).
(२) पुत्र भास्करराव छ २१ साबान, इसन्ने सितैनांत (१८ मार्च १७६२) झाला.
(३) बाजीराव रघुनाथ.
(४) चिमणाजी रघुनाथ.
(ड) यांस प्रथम औरस पुत्र झालेला लहानपणीच वारला. बाजीराव यांचे जन्माचे अगोदरच समान सितैन मया व अलफ, छ १ जिलकाद (२० मार्च १७६८) रोजी बऱ्हाणपूरकर भुसकुटे यांचे घराण्यातील अमृतराव यांस दत्तक घेतले होते. नंतर पुढें औरस पुत्र दोन झाले.
(ई) नारायणराव बल्लाळ पेशवे यास मारेकऱ्यांनी मारल्यावर राज्यकारभार दादासाहेब यांणीं चालविला. यांचे नावचा शिक्का रघुनाथ बाजीराव प्रधान ह्मणोन अर्बा सबैनांत
साबान महिन्यांत नवा केला होता.
(फ) अर्बा सबैनांत मया व अलफ, मार्गशीर्ष व॥ ३ रोजीं रघुनाथ बाजीराव आनंदवलीस वारले (११ डिसेंबर १७८३).
(ग) बायको आनंदीबाई अर्बा तिसैन फाल्गुन शु॥ ११ रोजीं आनंदवलीस वारली (२७ मार्च १७९४).
७. जनार्दन बाजीराव.
(अ) यांचा जन्म छ २९ सफर सीत सलासीन (१० जुलै १७३५) साली झाला. उष्टावण
छ १५ साबान रोजीं सदर्हू सालांत झालें.
(ब) लग्न अर्बा अर्बैन मया व अलफ वैशाख व॥ ५ रोजी झालें. (२० एप्रिल १७४४). रामाजी नाईक भिडे यांची कन्या. नांव सगुणाबाई.
(क) खमसैन मया व अलफ भाद्रपद व॥ ७ (२१ सप्टेंबर १७४९) रोजी सातारा येथे वारले.
(ड) बायको सगुणाबाई छ १७ जिलकाद अर्बा समानीन कार्तिक व॥ ४ गुरुवारी (१३ नोव्हेंबर १७८३) रोजी मौजे जलालपूर नाशिक येथे वारली.
८. सदाशिव चिमणाजी ऊर्फ भाऊसाहेब.
(अ) यांचा जन्म इहिदे सल्लासीन मया व अलफ साली झाला. पुत्र झाल्याची खबर स्वारीत छ ४ सफर रोजी कळली. नामकरण छ ११ सफरी (१४ आगष्ट १७३०) झाले. यावरून मोहरम अखेरीस (३ आगष्ट १७३०) जन्म झाला.
(ब) सीत सल्लासीन छ ९ सवाल (११ फेब्रुवारी १७३६) रोजी मुंज झाली. (एक) यांची लग्नें दोन झाली. पहिली बायको उमाबाई छ २४ रबिलाखर खमसैनांत वारली (२२ मार्च १७५०).