(४५) मुंबईहून दोन साहेब सरदार येत होते त्यांस बिघाड जाला हें ठाऊक नाहीं, सबब वडगावाहून तळेगावास येत होते, त्यांस बाबाजीपंत गोखले फौज घेऊन मुंबईचे वाटेचे बंदोबस्ताकरितां गेले त्यांणीं त्या सरदारास धरून फांशीं दिल्हे व दोन सरदार हैद्राबादेहून पुण्यास येत होते त्यांस उरळीस धरून कांगोरीत कैदेंत ठेविलें, तेथून काढून वासोटयावर नेऊन ठेविले. जरनेल इस्मित साहेब यास लढाईचे वर्तमानाचें पत्र पावले नाहीं. परंतु डाकेचे पत्र पोचणार नाहीं ते दिवशीं पुन्हा बिघाड जाला असें समजावें असा इजरा होता. त्यावरून डाकेचे पत्र पावलें नाहीं. सबब विंचुरकराकडील फौज तैनातीस होती त्यास सांगितलें कीं पुण्याकडील वर्तमान पुर्ते समजत नाहीं, परंतु बिघाड जाला असें दिसते. याजकरितां तुम्ही लष्करांत राहूं नये निघोन जावें म्हणोन सांगोन त्यास लाऊन देऊन आपण माघारे येऊं लागले. त्याचे तोंडावर नारोपंत आपटे फौज घेऊन गेले त्याणीं वाटेनें इंग्रजाचे बंगले होते ते जाळले. इस्मित साहेब याची फौज येऊन पोचूं नये असें श्रीमंताचे मनांत होते. परंतु इंग्रजी फौजेपुढे यांच्यानें कांहीं जालें नाहीं. फौज खंडेरायाचे माळावर येऊन पोचली. अक्कलकोटकर याजकडील सरदार नारोपंत आपटे याजबरोबर होता तो ठार पडला. आपटे याणीं लष्करचे कांहीं बैल आणिले.
(४६) कार्तिक शु॥६ शुक्रवारीं १४-११-१७ रात्रीस इंग्रजी फौज छापा घालावयाकरितां तयार होऊन नदीत आणली. परंतु तोफा जावयास सोय नाहीं सबब माघारे गेले.
(४७) कार्तिक शु॥ ८ रवींवारीं छ ६ माहे मोहरमीं १६-११-१७ येलवाडयावर श्रीमंताकडील फौज अरब व गोसावी होते व बापू गोखले फौज सुध्दा होते. इंग्रजी सरकारची पलटण चालून आली त्याची मारगिरी जाली. अरब गोसावी कांहीं मारले गेले. बाकी फौज पळोन माघारी आली. श्रीमंत त्याच वेळेस रात्रीं निघोन अप्पासाहेबांसुध्दा सासवडीं गेले. फौजा झाडून उधळल्या. दुसरे दिवशीं गोखले वगैरे फौजा जमा होऊन सासवडास गेले. तेथें राहून काहीं जाबसाल करावा असें श्रीमंतांचे मनांत होतें. परंतु भोसले, होळकर, शिंदे यांचा भरंवसा होता व बापू गोखले याचा रुकार न पडे सबब श्रीमंत फौजसुध्दां पुढें माहुलीस गेले. इंग्रजबहादूर यांणीं शहरांत शनवारचे वाडयांत झेंडा कार्तिक शु॥ ९ सोमवारीं लावून शहरचे लोक हवालदील होऊन पळों लागले त्यांस दिलभरंवसा देऊन उदमी व सावकार वगैरे सर्व रयतेचा बचाव केला. पुण्याचे कामावर राबीसन साहेब यास ठेविलें, आणि अल्पिष्टण साहेब व इस्मित साहेब फौज घेऊन श्रीमंताचे पाठलागास गेले.
(४८) पटवर्धन, निपाणकर, रास्ते वगैरे जाहागीरदार यांस पत्रें पाठविलीं कीं श्रीमंतांनीं कांहीं कारण व जाबसालाची तक्रार नसतां इंग्रजी सरकाराशीं बिघाड केला; त्यास श्रीमंतांनी बिघाड केला त्यामुळें सरदार लोकांचें नुकसान व्हावें असें सरकारचें दिलांत नाहीं; याजकरितां मेहेरबानांनीं आपले जागेवर राहावें ह्मणजे लढाई पावेतों चालत आहे तसें चालेल.
(४९) करवीरकर महाराज यांस सदर्हूप्रमाणें पत्र गेलें. ते दोस्ती राखून आपले जाग्यावर कायम राहिले.
(५०) श्रीमंत, पुढें, मागें इंग्रजी लष्कर, याप्रमाणें फिरत होते. श्रीमंतांस निपाणकर कोरेगांव यावर येऊन भेटले. वासोटयास सातारकर महाराज यास ठेविलें होते त्यांस आणावयाकरितां श्रीमंतांनी नारो विष्णू यास स्वारीसुध्दां पाठविलें. त्यांनीं जाऊन महाराजांस जवळ लष्करांत आणलें. श्रीमंतांच्या महाराजांच्या भेटी झाल्यानंतर त्रिंबकजी डेंगळे फौजसुध्दां नारायणगांवास येऊन श्रीमंतांस भेटून लष्करांत उघडपणें राहिला. श्रीमंत वाडयाकडे गेले. त्याजवरून इंग्रजी फौज घोडनदीकडून नगरावरून संगमनेरावर गेली. बापू गोखले याचा पुत्र ब्राहमणवाडयावर वारला. त्याची स्त्री सती गेली. याजमुळें तेथें मुक्काम होते. इंग्रजी लष्कर संगमनेराकडून आलियाची बातमी लागल्यावरून माघारें फिरून फुलगांवास आले. पुण्याकडून घोडनदीवर सरंजाम जात होता तो वाघोलीस गेला. त्याजवर नारो विष्णू फौज घेऊन गेले तेथें गोळागोळी जाली. पठारा शिलेदार नारो विष्णूकडील तेथें पडला व घोडी व लोक जखमी ठार जाले. घोडनदीकडून पलटणचे लोक चार पांचशें पुण्यास येत होते त्यांस श्रीमंतांचें लष्कर फुलगांवावर आहे ही बातमी नव्हती, व श्रीमंतांसही बातमी नव्हती. कोरेगावाजवळ येतांच श्रीमंताकडील फौजेने पाहून सारी फौज तयार होऊन त्याजवर गेली.