(७) वरच्या कलमांत खर्च द्यावयाचा करार झाला आहे त्याचे बेगमीविशी आलाहिदा कागद या तहनाम्याबराबर दिल्हा आहे, त्यांत मुलूख व अमल लिहिला आहे तो हमेशाकरितां इंग्रजी सरकारांत श्रीमंतांचे सरकारांतून दिल्हा आहे. त्या मुलकावर श्रीमंतांचे सरकारचा हक्क व दाया हरतऱ्हेचा नाहीं. असेल तो दरोबस्त सोडून दिल्हा व तेथील सरदार, भुमे,जमेदार वगैरे याजवर इखलाख ठेवणार नाहीं. याप्रमाणें श्रींमंतांचे सरकारांतून करार होत असे.
(८) मुलुख द्यावयाचे कलमावर लिहिले आहे. त्यास, जो मुलुख करार होईल त्यांत जो इंग्रजी सरकारचे उपयोगी नसेल तो फिरवून त्याचे मोबदला इंग्रजी सरकारची सरहद्द साफ होईल असा लावून द्यावा. सातवे व आठवे कलमाबरहुकूम मुलूख लावून दिल्हा जातो यांत इंग्रजी सरकारचा हुकूम राहील, श्रीमंतांचे सरकारचा दावा राहणार नाही.
(९) मुलुख जो इंग्रजी सरकारांत दिल्हा जातो त्याविषी श्रीमंताचे सरकारांतून आपले अंलदारांस हल्ली तूर्त मुलूख हवाली करावयाविशीं ताकीदपत्रें द्यावी. मृगसालापुढे त्या मुलकातील ऐवज श्रीमंतांचे सरकारचे अंलदारांनी वसूल केला असेल तो इंग्रजी सरकारांत परत द्यावा, बाकीविशीं वगैरे द्यावा त्या मुलकावर करूं नये.
(१०) अलाहिदा कागदांत जो मुलूक लिहिला आहे त्या मुलकांत जे किल्ले असतील ते मुलकाबरोबर कुंपणी सरकारचे हवाली होतील. श्रीमंतांकडून करार होत आहे जे किल्ले जसे आहेत तसे हवाली होतील.
(११) जो मुलूक इंग्रजी सरकारचे हवाली होत आहे त्यांत फंदफितवा वगैरे जाल्यास इंग्रजी लष्कर श्रीमंतांचे सरकारचे तैनात आहे त्यापैकी जितके कारण लागेल तितकें पाठविण्याविशीं श्रीमंतांचे लष्करातून इनायत होईल.
(१२) किल्ले अमदानगर व त्याचे आसपास जें मैदान आहे त्यापैकी रेवणीचे बाहेरचे हद्दीपासून चौफेर चार हजार हात जमीन श्रीमंत इंग्रजी सरकारांत हमेशाकरितां देत आहेत. व इंग्रजी लष्कराचा मुकाम जेथें जेथें आहे तेथे कही करिता छावणीजवळ कुरणे श्रीमंतांचे सरकारांतून इंग्रजी सरकारांस लावून देत आहेत. वसईचे तहमान्याचे रुइने तहनामा अमलांत आणावयाकरिता जितके इंग्रजी लष्कर श्रीमंतांचे मुलकांत आणावे लागेल तितके आणावें. त्यांत शुखन पावावयाकरितां श्रीमंतांचे सरकारांतून करार होत आहे की तैनाती लष्कराशिवाय जितके लष्कर इंग्रजी सरकारचें श्रीमंताचे मुलकांत राहील त्याविशी मनाई नाहीं. जाजती लष्कर येईल जाईल व मुलकांत राहील त्याचा खर्च या तहनाम्याचे रुईनें श्रीमंतांकडून इंग्रजी सरकार मागणार नाही.
(१३) सुभा बुंदेलखंड बमय सागर व झाशी व गोविंदराव गंगाधर यांचा मुलूक यांजवर श्रीमंतांचे सरकारचा हक्क, दाया व हुकूमत जमिनाचा व ऐवजाचा असेल तो दरोबस्त श्रीमंत इंग्रजी सरकारांत हमेशाकरितां देत आहेत. त्या जिल्हेच्या सरदारांशी श्रीमंतांचा इलाखा कांही एक राहिला नाहीं.
(१४) श्रीमंतांचे सरकारांतून हाल्ली करार होत आहे जे माळवे वगैरे मुलकांत श्रीमंतांचे सरकारचा दाया व हुकूम चालत असेल तो नर्मदापारचे मुलुकांत श्रीमंतांचा दावा व हुकूमत असेल ती, सुभे गुजराथ खेरीज करून, दरोबस्त श्रीमंत इंग्रजी सरकारंत हमेशाकरितां देत आहेत व पुढेहि हिंदुस्थानचे मुलुकांत मोबदला करणार नाही असा करार करीत आहेत.