(६) पेंढारियांचे बंदोबस्ता करितां लाट साहेब यांचें पत्र आलें.
(७) चिंतोपंत देशमुख फाल्गुन शु॥ १४, छ १३ रबिलाखर, पुण्याचे मुकामीं वारले.
२-३-१७.
(८) अल्पिष्टण साहेब बोलतात हे लाट साहेब यांचे हुकुमानें बोलत नाहींत असें श्रीमंतांस कोणी भासविलें. त्याजवरून लाट साहेब यांजकडे वकीलीस अन्याबा राहितेकर यांस पाठवावें असें ठरवीत होते.
(९) अल्पिष्टण साहेब यांणीं श्रीमंतांस पाटसाहेब याजबराबर बहुत तऱ्हेनें सांगून पाठविलें व चिठया पाठविल्या कीं त्रिंबकजीकरितां इंग्रजी सरकारची दोस्ती बिघडल्यानें महाराजाचा फायदा होणार नाहीं, नुकसान आहे, याजकरितां वारंवार सांगतों, हे महाराजांनीं मनांत आणून त्रिंबकजीस धरून हवाली करावा, अगर आपले मुलकांतून काढून द्यावा. असें सांगत असतां तें श्रीमंतांस पसंत वाटलें नाहीं आणि आंतून त्याची पुरवणी करू लागले व फौज जमा करू लागले व शिंदेहोळकर यांस अनुकूल करून घेण्याकरितां कारस्थान चाललें होतें त्याची वृध्दी करूं लागले. त्रिंबकजी धरल्यापासून दिवसेंदिवस गोखले यांजवरच श्रीमंतांचा भरंवसा होत गेला. शंभूमहादेवाचें रानात त्रिंबकजी आहे असें समजल्यावरून इंग्रजी सरकारची फौज त्याजवर गेली. त्यांस गांववालें बातमी देखील न देत. याजवरून इंग्रजी सरकारचा निश्चय झाला कीं त्रिंबकजीस सरकारचा आश्रय आहे, त्यापेक्षा श्रीमंतांसच कांहीं अडचण पडल्याशिवाय त्रिंबकजी हवालीं होत नाहीं. असें मनांत आणून जनरेल इस्मित साहेब फौजसुध्दा पुणेनजीक वैशाखमासीं आले. नंतर वैशाख व॥ ६ बुधवारीं छ १८ जमादिलाखर श्रीमंतांस अल्पिष्टणसाहेब याणीं चिटी पाठविली की एक महिन्यांत त्रिंबकजी हवाली करावा, याचे भरवशा करितां रायगड व सिंहगड पुरंधर तीन किल्ले इंग्रजी सरकारांत ठेवावे, हें आजचे रोजांत न झाल्यास शहराभोवतीं इंग्रजी सरकारच्या फौजेची तंबी होईल, अशी पाठविली. व दुसरी चिठ्ठी पाठविली कीं पहिली चिटी गेली आहे त्याप्रो महाराजांनीं केल्यास गादी कायम राहील. कृष्णराव गोपाळ सदाशिवपंतभाऊ यांचे घरी नेहमी जाऊन बसलें सारा दिवस तसाच गेला. मध्यरात्रींस प्रभाकरपंत जोशी व बापू कवडीकर श्रीमंतांकडून चार रोजांची मुदत मागावयास आले. साहेबांनी मुदत दिल्ही नसतां श्रीमंतांस मुदत मागून घेतली असें जाऊन सांगितलें. श्रीमंताकडून तीन प्रहर रात्रपर्यंत कांहीं जाबसाल न येई. सबब इंग्रजी सरकारची फौज तयार होऊन शहराभोवती वेढा वैशाख व॥ ७ गुरुवारीं छ १९ जमादिलाखरीं पहाटेस सूर्योदयाबरोबर दिल्हा. प्रात:काळी श्रीमंतांनी भाऊस सांगोन पाठविलें कीं चार रोजांची मुदत प्रभाकरपंत करोन आले आहेत, तुह्मी रूजू करून घ्यावी. त्याजवरून भाऊंकडील जयवंतराव, कृष्णराव गोपाळ व प्रभाकरपंत असे संगमावर गेले. तेथें मुदत दिल्ही नाहीं असें साहेबांनीं सांगितलें, नंतर माघारे गेले. साहेब निघोन पर्वतीनजीक आपले फौजेंत गेले. तेथें भाऊकडील बाळाजीपंत कारकून तीन किल्ल्यांच्या चिठया सोडणेविशीं घेऊन आले. त्या साहेबांनी घेऊन किल्ले हवाली करून घ्यावयाकरितां तीनहि किल्ल्यास फौजा रवाना केल्या. जनरेल इस्मित साहेब विठ्ठलवाडीकडे जाऊन राहिले. अल्पिष्टन साहेब संगमावर गेले.
(१०) श्रीमंताकडे अल्पिष्टण साहेब यांणी सांगून पाठविले कीं बापू कवडीकर यास प्रभाकरपंत याचे रुजुवातीकरितां पाठवावें. त्याजवरून श्रीमंतांनी पाठवून दिल्हे. त्याणीं जबानी लिहून दिल्ही की साहेबांनी मुदत दिली नसता आम्ही बोललों याचें कारण माधवराव नारायण यांचे वेळेस मुंबईस कोणी तकशीरदार फाशी द्यावयाचा ठरला असता श्रीमंताचे मर्जीबद्दल माफ केला, असें होत आलें. तेव्हां हेंहि घडेल, याजकरितां बोललो. असें लिहून दिल्यावर जबानी साहेबांनी श्रीमंतांकडे पाठविली आणि सांगितलें की प्रभाकरपंत यांस आह्मी कैद केले, बापू कवडीकर सरकारचे चाकर, जसें मर्जीस येईल तसें करावें. त्यावरून बाह्यात्कारी त्याचे घरी श्रीमंतांनी चौकी बसविली.