तेव्हां गोखले ह्मणाले कीं ठीक आहे, परंतु, तुमचा आमचा तह व्हावयाचा नाहीं, जें होणें तें लढाईचे अंतीं होय, तुम्हास दारू गोळा नसला तरी पोहचता करितों, रसद वगैरे पोचवितों, स्वस्थ होऊन लढाई व्हावी हें चांगलें. तेव्हां इंग्रज बोललें कीं आह्मास कुंपणीचा हुकूम असा आला आहे. तेव्हां गोखले याणीं सांगितलें कीं आम्ही सांगितलें असें लिहावें. दुसरें वर्तमान कीं गोविंदराव काळे हैदराबादेस गेले होते ते दहा वीस हजार फौजेनिशी आठ पंधरा दिवशीं येणार. असेंहि बोलतात. कोणी म्हणतात कीं जुन्नरची फौज खेडास आली. खेडापासून खंडणी दहा हजार घेतली. पुढें रोख होत चालले आहेत. पुणेयाहून इंग्रज याचीं पलटणें दोन तोंडावर गेलीं आहेत. असेंहि बोलतात. शहरांत वाडयांतील पहारेकरी होते ते कांहीं सरकारच्या वाडयाचा जामदारखाना होता त्याची भिंत फोडावयास लागले. ते कुडतीवाले यांणीं धरून वाडयात नेले. कोणी बोलतात नानाजी माणकेश्वर याचे येथें मेजवानीस गेले तेथें रुपये ६०,००००० साठ लाख घेतले आणि फौजेस खर्चास दिल्हें. असेंहि लोक बोलतात. कोणी म्हणतें होळकर याची बायको फौजसुध्दां महेश्वरास आली. फौज सुमारीं ऐशी हजार आहे. पुणेकडे जेजुरीस येणार असेंहि वर्तमान बोलतात. कोणी म्हणत श्रीमंत, नबाब एक होणार. आणिक एक वर्तमान, नारो विष्णू फौज सुमारीं दहा हजार येऊन, वासोटयास येऊन, महाराज छत्रपती व दोघे भाऊ व मातोश्री ऐशीं घेऊन, स्वारींत गेले. असेंहि बोलतात. असें वर्तमान जनवार्ता शहरांत रविवारचे सायंकाळ परियंत जाहलें. शिरस्तेप्रमाणें तोफ जाहाली. मित्ती शु॥ सोमवारी वर्तमान श्रीमंताची स्वारी गारदौडेस आली असें बोलूं लागले. कोणी म्हणते, सासवडास येणार असेंहि बोलतात. दुसरें वर्तमान दाभाडे याचें तळेगांव फिरंगी यानीं जाळिलें आणि भवतालें गाव लुटले असेंहि बोलत आहेत. चिंचवड लुटणार असेंहि म्हणतात. सारांश फिरंगी यांची जेरी, श्रीमंताची जबरी असें सोमवारचें वर्तमान आहे. आणीक एक वर्तमान, रामोशी अ॥ २००० जमले आहेत, शहरावर चालून येणार. तेव्हां फिरंगी गडबडला आहे. सावकारींत ताकीद केली कीं तुम्ही हुशार असा, आज गलबल आहे, तेव्हां रविवार रात्रपासून शहरांत पुनरपि रात्रौ हुशारी भारी आहे. सोमवार सायंकाळ जाहला. शिरस्तेप्रमाणें तोफ जहाली. मित्ती शु॥८ भोमवारचें वर्तमान शहरांत प्रात:काळीं उठलें कीं श्रीमंताची स्वारी आज पुलगाव आपटीस येणार, तेथें त्रिंबकजी डेंगळा येऊन भेटणार. बराबर भिल्ल सुमारी ५००० व १०००० हजार फौज घेऊन आला आहे असे बोलू लागले. दुसरे बोलतात की मोरेश्वरास आले, बरोबर स्वारीची फौज सुमारी २५००० पंचवीस हजार आहे. कोणी ह्मणते की गोखले व पुरंधरे यांचे मात्र बनत नाहीं, इंग्रजाचा व श्रीमंताचा सल्ला जाहला. गोखले याचे लष्करांत महाराज छत्रपति आहेत असेंहि बोलतात. कोणी ह्मणतें की यांचा त्यांचा तह सर्वांचे मते जाहला ह्मणून बोलूं लागले. कोणी ह्मणते स्वारी गंगेकडे नाशिक कोपरगांवास जाते असेंहि ह्मणतात. कोणी ह्मणतें पुरंधराखाली तीन हजार फौज घेऊन नारो विष्णू आले आहेत. + + + राईतून इंग्रजांची पलटणें जाणार, त्यांची तयारी जाहाली होती ती राहिली. ऐशी सायंकाळ जाहली. भोमवारी रात्री शिरस्तेप्रमाणे तोफ जाहली. मित्ती शु॥ ९ बुधवार प्रात:काळी शहरांत वदंता आली कीं स्वारी तळेगावास नेऊन केंदूर पाबळेस मुक्कामास गेले. लोक बोलतात की सल्ला जाहला. दो चो दिवशी पुण्यांत अम्मल पेशव्यांचा येतो असेंहि बोलतात. त्रिंबकजी डेंगळा जाऊन बापू गोखले यासी मिळाला असेंहि बोलतात. फिरंगी याची पहिली रसद गेली आहे ती अजून पोचली नाहीं, तिला मराठी फौजेने वोढिलें आहे असेंहि बोलतात. कोणी ह्मणतें कोपरगावास स्वारी जाणार, इकडे सध्या येत नाहीं. अशीहि वदंता आली आहे. सायंकाळ जहाला. शिरस्तेप्रमाणे तोफ जाहाली. रात्र गुजरली. प्रात:काल जहाला. मि॥ शु॥ १० गुरुवार. आज स्वारीचा मुक्काम नारायणगावचा आहे असे लोक बोलतात. गोखले मागून तळेगाव परियंत आले, इंग्रज तीन कोश मागें, त्याचे मागें सरकारची फौज आहे. पुरंधरे, आपटे आहेत, असें लोक बोलतात.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57