श्रीशंकर.
पेशवाईच्या अखेरची अखबार.
राजाश्रियाविराजित राजमान्य राजश्री हरी विठ्ठल स्वामीचे सेवेसी :- पो॥ वेंकट बल्लाळ सा नमस्कार विनंति येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत असावें. विशेष. आपणाकडून अलीकडे कांहींच मजकूर समजत नाहीं; त्यास सविस्तर कळवावा म्हणून लिहिलें. त्यास, इकडील मजकूर राजकी देवकी लिहिला आहे. पाहून उत्तर यावें. कलयुगीं म्लेंच्छ मर्दून साधुप्रतिपालक केवल ईश्वरी अवतार श्रीमंत कैलासवासी बाळाजी विश्वनाथ यांचा जाला. त्यांज मागें बहुत लढाया मारून दुष्टसंहार करीत करीत आले. त्यांचे पाठीं श्रीमंत कैलासवासी माधवराव बल्लाळ यांनींही प्रताप तसाच केला. पुढें ते निजधामास गेले. मागें श्रीमंत कैलासवासी नारायणराव यांणींहि थोडेच दिवस राज्य करून कैलासास गेले. पुढें श्रीमंत कैलासवासी रघुनाथ बाजीराव यांणीं राज्य कांहीं दिवस केलें. पुढें श्रीमंत कैलासवासी माधवराव नारायण होऊन चोवीस वर्षे राज्य करून वैकुंठास गेले. त्यांपुढेंश्रीमंत महाराज बाजीराव रघुनाथ राज्य करीत असतां पदरचे सरदार होळकर व शिंदे यांची लढाई पुणेयावर होऊन महाराज वसईस गेले. पुढें जळचर यांशीं आणून राज्य करूं लागले. त्यावर चवदा वर्षें राज्य प्रभू यांणीं जशी प्रजापालन करणें ती केली. पुढें बडोद्याहून गंगाधर शास्त्री येथें आला. त्यामुळें कलहास आरंभ जाहला. पुढें दोचहूं महिन्यांनीं येथील प्रभूचे कारभारी सदाशिव माणकेश्वर व जळचराकडील वकील मोधीशेट या उभयताला काढून आपण कारभार करावा असें शास्त्री याचे मनांत आले. तेव्हां मोधी यांणीं प्राण दिला. प्रभू यांसी बहुत अवघड पडलें. तेव्हां श्री पंढरीचे यात्रेस सर्व मिळून गेले. तेथें शास्त्री यासी दगा जाहला. पुढें जळचर याणें प्रभूवर निमित्य घेतलें कीं शास्त्री यासी दगा आपले कडील माणसांनीं केला. त्यास, आमचे स्वाधीन तीं माणसें करावीं. तेव्हां बहुत संकटेंकरून त्रिंबकजी डेंगळा यास स्वाधीन केलें. त्याणें नेऊन साष्टीचे बेटांत कैद करून ठेविलें. कित्येक दिवस कैदेंत राहून डेंगळे यानें पलायन केलें. पुढें तो आपज्याळ प्रभूवर जळचरांनीं आणून जाबसालांत कोंडून कुंठित केलें. पुढें प्रभूची स्वारी फुलगांव आपटीस गेली. तेथें वाटेनें रथ मोडून हात दुखावला. तेव्हां स्वारी तीन मास राहून पुणें मुक्कामीं आली. तेव्हां इंग्रज याचे बोलणें कीं डेंगळा पळविला तुम्हीं व पेंढारी आणिले तुम्हीं.याचा बंदोबस्त करावयास तुह्मांस सांगत असतां तुमचेनें होत नाहीं. तेव्हां आम्हांस बंदोबस्त करणें प्राप्त. याजकरितां कांहीं पलटणें येथें ठेवावीं लागतात. त्यासी, मुलूख तुम्हीं आम्हांस द्यावा. न द्याल तरी आह्मीं तुम्हापासून घेऊं. ऐसे ७ सप्तमीस हें वर्तमान होऊन, इंग्रज यांणीं शहर पुणे याची नाकेबंदी केली. तेव्हां सदाशिव माणकेश्वर मधें पडून जाबसाल ठरविला कीं तीन किल्ले तूर्त घ्यावे. मग बोलणें जें होणें तें होईल. तेव्हां तीन किल्ले इंग्रज याचे हवालीं केले:- किल्ले रायगड, किल्ले सिंहगड, किल्ले पुरंधर, एकूण तीन किल्ले देऊन वेढा उठविला. पुढें वारी श्रीपंढरीची आली. तेव्हां स्वारी जाणें. अवकास थोडा. तेव्हां जो मुलूख पाहिजे तितका त्यांस देऊन, अजमासें लाख छत्तिसाचा देऊन, स्वारी श्रीस गेली. पुढें तेथें मास एक राहून माहुली क्षेत्रीं आलें. तों येथे पुणें मुकामीं हें केलें हें टीक नाहीं असे समजून हैदराबादेहून मळकट साहेब म्हणून एक मोठा माणूस इंग्रजांकडील आला आणि स्वारी माहोलीस आली असें समजल्यावर तेथें गेला. बरोबर दीक्षित नाना ही गेले. तेथें जाऊन कांहीं जवाहीर नजर करून बोलिला कीं महाराजांनी X X X X वाईट केली. हालीं मी आपलें सारें माघारें (देतों. हें बोलणें) प्रमाण कशावरून ? तेव्हां सांगितलें कीं आज पासून दहा दिवशीं आपले किल्लें आपल्यास देतों.त्याप्रमाणें किल्ले माघारें दिल्हे. आणि मुलूख द्यावा तो अल्पिष्ट त्याचें ऐकेना. सबब तो निघोन गेला. किल्ले मात्र त्याचे हस्तगत जाहाले. तेथें मसलतीचा घाट घालून राजश्री बापु गोखले, गोविंदराव काळे याणीं मससती करून घाट असा केला कीं (इंग्रजांशीं लढावें). ऐसा निश्चय करून (तयारीस लागले). पुढें मोर दीक्षित कामामध्यें इंग्रजांचे वागूं लागले. पुढें फौजा जमा भारी केल्या.