साष्टीमुंबईहून जहाजें आणून निघोन गेला. गाडर इंग्रजांनी हिंदुस्थानांत जागा जागा लढाया करून शेर होऊन त्या तऱ्हेनी इकडे आला होता. परंतु स्वामीच्या तेजप्रतापेंकरून शत्रूचें पारिपत्य करून पराभव केला. महाराष्ट्र राज्यसाधनाचें वृत्त विस्तारे सारांश लिहिला आहे. त्यांत मुख्य शिवाजीमहाराज यांणीं स्वत: साहसकर्म करून राज्यसाधन केलें. त्यांचे मागें शाहूमहाराजांचे तेजप्रतापें श्रीमंत बाळाजीपंतनाना व बाजीरावसाहेब व नानासाहेबीं त्याहीपेक्षां राज्यवृध्दी केली. शाहूमहाराजांचे मागें राजारामसाहेबीं राज्यासनीं आरूढजाहल्यावर नानासाहेब व माधवरावसाहेब यांणीं शत्रू पादाक्रान्त करून त्याहीपेक्षां राज्याचीवृध्दी अधिक केली. राजारामसाहेबीं सत्तावीस वर्षें राज्य केलें. त्यांसी वेथा होऊन वेथित होते. पोटीं पुत्रसंतान नाहीं. महाराजांची वंशवृध्दी चालवून राजमुद्राविराजित राज्य शोभिवंत असलें पाहिजे. याजकरितां स्वामींनी विचार करून महाराजांचे गोत्रपुरुष त्रिंबकजी भोसले वाईकर यांचा पुत्र आणून सुमुहूर्ती दत्तविधान करून, महाराजांचे मांडीवर बसवून शाहूराजे नांव ठेविलें. त्याजवर शके १६९९ हेलंबी नामसंवस्सरीं मार्गशीर्ष शुध्दपक्षीं राजाराम साहेब कैलासवासी जाहाले. त्याजनंतर शके १७०० विलंबीनामसंवत्सरीं मार्गशीर्ष वद्य ८ सन तिसा सवैनांत सुहूर्तें राज्याभिषेक करून राज्यारूढ केलें. त्यास, या महाराजांचे कारकीर्दीस खाम प्रतापी आहेत. इंग्रजांनीं हिंदुस्थानांत व दक्षिणेंत सौखी केली. गर्व होऊन सरकारांत अमर्यादा करून लढाईस सन्मुख जाहाले. त्यांचें पारिपत्य स्वामींनीं सरदार फौज पाठवून पारिपत्य करविलें. स्वामींचे तेजप्रतापें करून इंग्रजांनीं तह करावयासी वकील पाठविले. हात जोडून अर्जमात केला. त्यांणीं घेतलेले किल्ले वसई व बेलापूर व कल्याण व अमदाबाद देखील मुलूख सरकारांत दिल्हा. यास्तव राजश्री माहादजी शिंदे यांणीं, त्याचे बाजिदीवर चहोंकडील बखेडा तुटोन, राज्याचा बंदोबस्त होता त्याजवर नजर देऊन, सरकारचा दाब बसवून तह केला.*
नबाब निजामलीखान, सासुभे दक्षणेचे सुभेदार, तेही स्वामींसी फार निखालसपणें वर्तत होते. लग्नसमयासी आपण यावें, हें त्यांचेही चित्तांत गतवर्षापासून होतें. परंतु यंदा जाबतजंगाच्या मसलतीस गुंतले याजमुळें त्यांनीं आपले पुत्र पोलादजंग व तवहारजंग कारभारी यांसी फौजबराबर देऊन पाठविलें. महाराजही साताऱ्याहून कृपा करून आले.लग्नाचा समारंभ राजश्री नानांनी मंडप, कापड व आरशाचे, वाडयांत व बागांत व वधूमंडप फारच तऱ्हेचे केले. व कागदी बाग व मेणाचीं झाडे तऱ्हेतऱ्हेचीं केलीं. आतषबाजीचें दारूचें काम फार केलें. कळसूत्रीचा रथ व थोर चवरंग व तक्तरावे करून, माणसाचे खांद्यावर देऊन, त्याजवी कळवंते स्वारी चालतां वधूमंडपावेतों जातां येतांना चिठीकागदीबाग चालवावे; सरकावाडयापासून वधूमंडपापर्यंत दिवे व चिराखदान व हिलाल दुरस्ता सारी रात्र लावावे; शहराभोंवत्या व शहरांत नाकेबंदी फौज व गाडदी ठेऊन कुल गलबला सभोंवता होऊं न द्यावा; या रीतीनें बंदोबस्त केला. नूतन कल्पना करून आरास फार चांगली केली. थोर थोर शिष्ट ब्राह्मणांस आमंत्रणें व पालख्या व घोडीं पाठवून आणून, ब्राह्मणभोजनाचा समारंभ करून, दक्षणा, वस्त्रें, स्वरूप पाहून अपार दिल्हीं. महाराजांच्या सेवेसी समारंभेंकरून वस्त्र, अलंकार, हत्ती, घोडे नजर देऊन महाराजांची स्वारी सातारियासी गेली. यांवर नबाबाचे पुत्र आले होते ते पंधरा दिवस पुणियास राहून, वाडयांत येऊन, भोजन करून, रागनृत्य पाहून स्वइच्छेनें येणें जाणें करीत होते. त्यांचे लष्करांत व सरदार राज्यांतील यांच्या लष्करास सामुग्री सर्व साहित्य दिल्हें. नवाबाच्या पुत्राची व सरदारांची मुदारत यथायोग्यतेनुरूप वस्त्रें, अलंकार, हत्ती, घोडे बहुमान करून ते निरोप घेऊन आपले स्वस्थळास गेले. सरकार दौलतींतील व देशोदेशींचे वकील व मुत्सदी, शिलेदार, कारकून, दरकदार, जमीदार, देशमुख व देशपांडे, पाटील, कुळकर्णी, बारा बलाते आदीकरून सर्वांसी वस्त्रें व भोजन बहुमान यथायोग्यतेनुरूप दिल्हें. या प्रकारें लग्नसमारंभ जाहला. फडणीस याणीं यथास्थित केला. या प्रकारें पूर्वीपासून राज्यआक्रमणाचा इतिहास जाहला ह्मणोन साद्यंत संकलित निवेदला आहे. निवेदन जाहला ह्मणजे साद्यंत ध्यानास येईल. श्रीमंत सवाई माधवराव अवतार धारण केल्यापासून अलीकडे सडयांनी पुण्यापासून दिल्लीपावेतों लाखों रुपयांचा जिन्नस, सोनें, रूपें व जवाहीर घेऊन गेलें असतां मार्गांत निर्भय जाऊन यावें, याप्रमाणें स्वतेजप्रतापेकरून सहज रीतीनें बंदोबस्त आहे. पूर्वी महाराज राजे राज्यरीती करून राज्य चालवीत होते त्या अन्वयें नीतीकरून, राज्याचा उपभोग करून, प्रजापालन होत आहे. ही कीर्ति दिगंतरी विराजली आहे. तेथें सेवकांनीं विस्तारें वर्णन काय करावें ? सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.