सरकारकुनांनीं विचार केला होता तो संभाजी राजे यांस कळला. तेव्हां सरकारकुनांनी पारिपत्यें करून राज्य करीत होते. त्या समयीं अवरंगजेब पातशहा दक्षिणेंत होते. विजापूर वगैरे पातशाहाती आक्रमिल्यानंतर संभाजी महाराज यांस धरून न्यावें या प्रेत्नांत होते. उपाय न चाले. ते समयीं कबजी कनोजा ब्राह्मण मातबर होता. त्यांणीं धरावयाची मसलत कबूल करून महाराजांजवळ आला. त्यास वशीकरण विद्या होती. त्यांणीं येऊन संभाजी महाराजांस मोहित केलें. सर्व कारभार कबजीच करूं लागला. संभाजी राजे व राजाराम राजे पन्हाळयास जाऊन, राजाराम यास पनाळयास ठेऊन, संभाजी राजे स्वारीस फिरों लागले. ते समयीं कबजींनीं पातशाही फौज आणविली. त्या फौजेवर संभाजी राजे यांहीं चढाई केली. युध्दप्रसंग होतां यांस मोडिलें. तेव्हां कोंकणात गेले. मागें फौजा लागल्या. संभाजी महाराज व त्यांचे पुत्र श्रीमंत शाहू राजे यांस संगमेश्वराहून धरून, अवरंगजेब पातशाह तुळापुरास होते, त्यांजवळ नेलें. पातशहाजवळ नेलें असता मुजरा न केला. संभाजीराजे खुबसुरत फारच होते. त्यांस बाटवावें असें मनांत आणून यास बाट म्हणून सांगून पाठविलें. तेव्हां संभाजीराजे यांही सांगून पाठविलें कीं तुमची बेटी बेगम आहे ती द्याल तरी बाटतों. त्यास, त्या रागांनीं संभाजीराजे यांचा शिरच्छेद करावयाचा हुकूम झाला. हें वर्तमान बेगमेस कळतांच अर्ज करावयास गेली तों शिरच्छेद केला. त्याजवर बेगमेस दादला करावयाविषयीं विचारलें. ते समयीं बोलिलीं कीं संभाजींनीं मला बायको करतों असें म्हटलें; याउपरि आपल्यास करणें नाहीं. ती तशीच राहिली.
शाहूराजे पातशहा लष्करांत होते. इकडे राजाराम राजे राज्य करीत होते. त्यास, संभाजी राजे मारल्यावर अवरंगजेब पातशहा घेतले. गडकिल्याचा बंदोबस्त करीत चालिले. ते वख्ती राजाराम राजे व त्यांच्या स्त्रिया ताराबाई व राजसबाई पनाळा किल्यावर सरकारकुनांसहवर्तमान होते. त्यास पनाळा किल्ला मोर्चे देऊन घेतील, यास्तव पनाळा किल्याहून रांगण्यास गेले. तेथून चंदीस करनाटकांत स्त्रिया व सरकारकुनांसह निघोन गेले. हें वर्तमान पातशाहास कळतांच आसदखान वजीर याचे पुत्र झुलपुकारकान यास फौजसुध्दां चंदीस पाठविलें. त्यांनीं चंदीस जाऊन वेढा घातला. ते समयीं संताजी घोरपडे फौज घेऊन बाहेर राहून मोगलाशीं युध्द करीत; परंतु मोंगलांपुढें उपाय न चाले, चंदीही जेर होत चालली. त्या समयांत संताजी घोरपडे यांणीं प्रयत्न करून तजविजीनें राजाराम राजे यांस काढोन वेळुरास पोहोंचविलें. तेथून पनाळयास आले. बायकांस गणोजी शिर्के मोगलाईचा कर त्यांणीं, आपल्या बहिणी राजाच्या स्त्रिया असें न समजों देतां,झुलपुकारखानास विचारोन काढोन पनाळयास पोंचविल्या. सरकारकून चंदीस सांपडले त्यांणीं पैका खंड देऊन सुटोन आले. त्या दिवसांपासोन संताजी घोरपडे यांस हिंदुराई व सेनापती दिली. राजाराम राज्य करीत होते. कोणे दिवशीं राजाराम दरबारास बसले होते. ते वेळेस संताजी घोरपडेही होते. ते समयीं बोलिले कीं मी होतों ह्मणून राजे वांचले. त्यास सेवाधर्म करून दाखविला तो महाराजांचे चित्तांत होताच. परंतु त्यांणीं समक्ष बोलून दाखविलें. तेव्हां महाराजांचे चित्तास विषम वाटलें. तें संताजी घोरपडे यांस ही समजलें. तेव्हां येथें चाकरी करणें, राहणें वाईट, असें समजोन घोरपडे यांजवळ चाळीस पन्नास हजार फौज असतां उठोन चालिले. ते समयीं फौज सरकारची सारी राहिली. पंचवीस राउतांनिशीं जात होते. त्यास घोरपडे यांणीं पूर्वी शिलेदार म्हसवडकर जिवें मारिला होता, त्याचे घरीं अकस्मात् गेले. त्यांस उमजलें नव्हतें. परंतु त्या शिलेदाराचे बायकोस नांव कळतांच कुन्हा धरून भोजनास चांगले करून घातलें आणि वाटेंत मारेकरी ठेवून आपल्या दादल्याचा सूड घेऊन मारविलें. त्याजवर सेनापती धनाजी जाधवराव यांस दिल्ही.
राजारामराजे पनाळा किल्ल्यावर राज्य करीत होते. त्यास, अवरंगजेब पातशाहा विजापुराकडे होते. ते समयीं बाहादूरशाहा वडील पुत्र दिल्लीस होते व धाकटे पुत्र अजमशाहा जवळ होते. त्यास अवरंगजेब दक्षिणेंत वारले. तेव्हां अजमशाहा बहादुरशाहावर चढाई करून दिल्लीस चालिले. राजाराम, राज्यातील गडकिल्ल्याचा बंदोबस्त करावयास आले होते. ते सिहीगडास कैलासवासी झाले. पांच सात वर्षें राज्य केलें. त्यांचे मागें त्यांची स्त्री ताराबाई राज्य सरकारकुनांसह वर्तमान करीत होती.