॥ श्री ॥
पेशव्यांची बखर
इ. स. १७८३ पर्यंत.
श्रीमंत महाराज राजश्री रावसाहेब पंतप्रधान स्वामीचे सेवेसी विनंति सेवक आज्ञांकित बाळाजी गणेश कारकून नि॥ चिटणीस सरकार विज्ञापना. श्रीमंत शिवाजी महाराज यांनीं महाराष्ट्र राज्याचे वृध्दीविषयीं साहस करून राज्याभिवृध्दि कशी केली तें विस्तारें निवेदन करणें म्हणून शके १७०४ शुभकृत्ना संवत्सरीं कृपाळू होऊन आज्ञा केली. ऐशास, महाराजांनीं राज्यसाधन केल्याचें वृत्त येणेंप्रों:- मालोजी पाटील भोसले मौजे हिंगणी; देऊळगांव, वगैरे प्रांत पुणें येथून वेरुळास जाऊन राहिले. तेथें श्रीभवानी प्रसन्न झाली. त्यांचे पोटीं शहाजी राजे झाले. त्यांनीं दौलताबादेस पातशहाकडे जाऊन सेवा वजिरी करून राजे असा मरातीब मेळविला. वजिरी करीत होते. पातशाहाचीं मुलें लहान, त्यांस घेऊन मसनतीवर आपण बसोन मांडीवर बसवून दरबार करीत. जाधवराव वगैरे मनसबदार मातबर उभे राहून मुजरे करीत. त्यास, शाहाजी राजे मसनतीवर बसों लागले, हें जाधवराव वगैरे यांस न साहे. याजमुळें दिल्लीस राजकारण करून तेथून फौज जाधवराव यांनीं आणविली. त्या फौजेचा पेंच पडला. तेव्हां शहाजी राजे यांनीं पातशाहाचीं मुलें घेऊन कोकणांत माहुली किल्ल्यावर गेले. तेथें फौज येऊन वेढा घातला. ते समयीं रात्रीस मोर्चा करून आपण व बायको चालिले. पाठीवर जाधवराव व फौज लागली. तेव्हां बायकोस टाकून निघाले. बायको जिजाऊ, जाधवराव याची लेक, यांनीं राऊत देऊन शिवनेरी किल्ला शाहाजी राजे यांजकडेच होता तेथें पोंचविली. ती गरोदर होतीं. तिने पुत्र झाल्यावर तुझें नांव ठेवीन असा नवस किल्यावरील शिवाई भवानीस केला. पुत्र झाला. नांव शिवाजी ठेविलें. शाहाजी राजे विजापुरास जाऊन, तेथें जागीर मनसब मेळवून, करनाटक प्रांतीं जाऊन, चंदीचंदावर घेऊन, तीं संस्थानें आपली करून, तेथें दुसरी बायको तुकाऊ व पुत्र एकोजीराजे ठेविले. शाहाजी राजे मोगलाईंतच होते. त्यास, मोगलांनी हिंदुधर्माचा उच्छेद करून म्लेंछमय करावें या दुर्वृत्तीस प्रवर्तक झाला. तें देवास न साहे. यवनाचें पारपत्य करून हिंदुधर्म स्थापावा, याजकरितां शिवाजी महाराज यांजवर श्रीची कृपानुग्रह होऊन- त्या कालीं साता वर्षांचे होते- वय लहान होत्साता तेव्हांपासून मोठमोठीं अमानुषीं कर्में करून राज्य मेळविलें. म्लेंच्छादि शत्रू पादाक्रांत करून धर्मक्षेत्रादि महास्थानें, तीर्थाचीं व देवाचीं, स्थापना, पूजा ब्राह्मणापासून ब्रह्मकर्मे यागादि करवून श्रीरामेश्वरापासून गोदातीरपर्यंत धर्मस्थापना केली. शयाद्रि पर्वताचे किल्ले व समुद्रांतील बेटें, जंजिरे बांधून, फौज व पागा व हशम चाकर ठेऊन राज्यवृध्दी केली. मोठमोठे बलाढय तांब्र विजापूराहून व दिल्लीहून चालून आले. त्यांचा पराभव करून महाराष्ट्र राज्याची अभिवृध्दी पाववून निर्वैर केलें. त्या कालीं चित्तांत आणिलें कीं सर्व शत्रू पराभव झाले. आपल्या जवळ द्रव्यसंग्रह व मुलुख, किल्ले, कोट, फौज, पागा व पदाती व सरकारकून व सरदार पराक्रमी राज्य संरक्षणास असे आहेत. याजउपरि आपण सिंहासनाधीश्वरत्व करावें. हा संकल्प करून चाळीस वर्षांचें वय झाल्यानंतरीं किल्ले रायगडावर शालिवाहन शके १५९५ आनंदनामसंवत्सरीं ज्येष्ठ शुध्द त्रयोदशीस यथाशास्त्रोक्त सर्वांसमोर थोर थोर शिष्ट ब्राह्मण आणून राज्याभिषेक करून सिंहासनाधीश होते झाले. अष्टप्रधान ज्यास जें पद योग्य, स्वामीसेवेचे ठायीं तत्पर, कार्यकर्ते, पाहून योजिले. सिंहासनारूढ झाल्यावर सात वर्षेंपर्यंत धर्मरीतीनें राज्यपालन करिते झाले. महाराजांस दोघे पुत्र : वडील श्रीमंत महाराज संभाजी राजे व धाकटे राजाराम राजे. त्यास, संभाजी राजे महाराजांवर यागी होऊन किल्ले पनाळियास गेले. धाकटे राजाराम साहेब जवळ होते. त्याजवर, महाराजांस वेथा होऊन अत्यावस्थ राहिले. ते समयीं सर्व कारकुनांनीं विचार केला कीं संभाजी राजे उग्र, राजाराम शांतस्वरूप, यांस आसनीं बसवून राज्य करवावें. असा सिध्दांत केला. महाराजांस वेथा झाल्याची बातमी संभाजी राजे यांजकडे न जाई असा बंदोबस्त केला असतां, त्यांस वर्तमान जाऊन पावतांच निघोन रायगडास आले. त्यास शके १६०२ रौद्रनामसंवत्सरीं चैत्र शुध्द पोर्णिमेस दोन प्रहरीं कैलासवास महाराजांनीं केला.